Paddy Farming : येत्या काही दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. आपल्याकडे खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय आपल्या राज्यात धानाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते.
धान अर्थातच भात लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकणात सर्वाधिक आहे. या दोन विभागात भाताची मोठ्या प्रमाणात शेती होते.
आगामी खरीप हंगामात देखील भात रोवणी मोठ्या प्रमाणात होणार असा अंदाज आहे. आगामी मान्सूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने धान लागवडीखालील क्षेत्र वाढू देखील शकते.
अशा परिस्थितीत आज आपण धानाच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण रत्नागिरी आठ या धानाच्या सुधारित जातीची माहिती पाहणार आहोत.
शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 90 क्विंटलचे उत्पादन
रत्नागिरी 8 हे धानाचे एक नव्याने विकसित झालेले सुधारित वाण आहे. हा वाण 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला. या जातीचे पीक 135 ते 140 दिवसात परिपक्व होत असते. या जातीचे तांदूळ मध्यम आकाराचे असतात.
तसेच या जातीचा तांदूळ हा चवीला खूपच उत्कृष्ट असल्याचा दावा संशोधकांनी केलेला आहे. जर या जातीच्या पिकाची वेळेवर हार्वेस्टिंग केली गेली तर तांदूळ तुटत सुद्धा नाहीत. या जातीचे पीक मध्यम उंचीचे असते यामुळे पीक लोळत नाही.
करपा तसेच कडा करपा रोगासाठी या जातीचे पीक प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. याची जर वेळेवर पेरणी झाली तर विविध रोगांना आणि कीटकांना ही जात सहनशील असल्याचे आढळून आले आहे.
या जातीची लागवड आपल्या राज्यातील कोकण विभागात मोठ्या प्रमाणात होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी या जातीच्या पिकातून चांगली कमाई करत आहेत.
याशिवाय या जातीची लागवड उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये देखील केली जाऊ शकते. या जातीपासून सरासरी 55 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळत आहे.
दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून या जातीपासून 85 ते 90 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवले असल्याचा दावा संशोधकांनी यावेळी केला आहे. साहजिकच या जातीची रोवणी केल्यानंतर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.