भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे, मात्र आता देशातील नवयुवक शेतकरी पुत्र शेतीकडे न वळता नोकरीकडे तसेच व्यवसायाकडे जास्त आकृष्ट होताना बघायला मिळत आहेत.
पंजाबमधील (Punjab) नवयुवक तरुण देखील शेतीकडे पाठ फिरवताना बघायला मिळत आहेत. येथील बहुतेक तरुण आपले राहणीमान सुधारण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडासारख्या देशांमध्ये जातात.
यामध्ये पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील लोहारा गावातील राजविंदर सिंह धालीवाल या व्यक्तीचा देखील समावेश आहे. राजविंदर देखील आपले आयुष्य सुधारण्यासाठी अमेरिका (America) मध्ये नोकरी साठी गेला होता.
तो 2007 च्या सुमारास अमेरिकेत गेला होता. तेथे त्याने ट्रक चालविण्यापासून ते हॉटेलमध्ये अनेक प्रकारचे काम केले. त्याने अमेरिकेत सुमारे पाच वर्षे काम केले. 2012 मध्ये मायदेशी परतण्याची उत्सुकता राजविंदरला झाली आणि तो 2012 मध्ये मायदेशी अर्थात भारतात परतला आणि हॉटेल व्यवसायात हात आजमावला.
तथापि, त्यांचे कुटुंब दीर्घ काळापासून शेतीच्या पार्श्वभूमीशी जोडलेले होते. अशा स्थितीत त्यांना शेती करण्यात अधिक रस होता. राजविंदर सांगतात की, पंजाबमध्ये शेतकरी (Farmer) पीक घेताना रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. जे मानवी आरोग्यासाठी तसेच जमिनीच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
यामुळे राजविंदर यांनी शेती करायची मात्र रासायनिक खतांविना करायची असा मनोमनी निश्चय करून घेतला. यासाठी त्यांनी रासायनिक खतांशिवाय शेती कशी करता येईल यासंदर्भात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि 2017 मध्ये त्यांच्या वडिलोपार्जित 6 एकर जमिनीवर पूर्णपणे नैसर्गिक शेती सुरू केली.
सध्या राजविंदर आठ एकर शेतजमिनीत शेती करत आहेत. ते आठ एकर शेतीत ऊस, बटाटा, हळद, मोहरी ही पिके नैसर्गिक पद्धतीने उत्पादित करीत आहेत.
शेतीसोबतच राजविंदर प्राप्त झालेल्या शेतमालावर प्रक्रिया करून गूळ, साखर, हळद पावडर तयार करून बाजारात विकतात. असे केल्याने त्यांना इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत एकरी एक लाख रुपये अधिक नफा मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.
याशिवाय राजविंदरने शेतात आंबा, पेरू, चिकू, डाळिंब या फळझाडांचीही लागवड केली आहे. फळबाग लागवड करून देखील त्याला चांगला नफा मिळत आहे.
राजविंदर म्हणतात की, आजकाल शेतकरी नैसर्गिक शेतीतून पैसे कमवू शकतो जेव्हा तो मूल्यवर्धनासारख्या अर्थात शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागतो.
राजविंदर सोशल मीडियाचा मोठा प्रभावी वापर करत आहेत. त्यांना याची ताकद वेळीच समजली होती. तो या सोशल मीडियाचा वापर आपल्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी करत असतो.
राजविंदरच्या मते, त्याची वार्षिक उलाढाल 12 लाख रुपये आहे. त्यांना शेती व प्रक्रिया उद्योगमधुन दरवर्षी 6 ते 7 लाखांचा निव्वळ नफा मिळत आहे.
त्यांना यामध्ये अजून वाढ होण्याची आशा देखील आहे. निश्चितच पंजाबच्या या अवलिया शेतकऱ्याचा प्रयोग कौतुकास्पद असून यामुळे देशातील नवयुवक शेतकरी पुत्र शेतीत नवनवीन बदल करून चांगले उत्पन्न कमवतील.