पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वेळी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व इतर व्यवस्थापनाच्या अनेक बाबींना खूप महत्त्व असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा वेळेत पार पाडल्या जातात तेव्हा पिकांपासून आपल्याला उत्पादन हे भरघोस मिळते.
परंतु या सगळ्यांमध्ये जर जास्त महत्त्वाचे जर काही असेल तर ते म्हणजे जमिनीची सुपीकता होय. जमीन जर सुपीक नसेल व तुम्ही कितीही चोख व्यवस्थापन केले तरी देखील त्याचा फटका उत्पादन घटण्यावर दिसून येतो.
पिकांना आवश्यक असलेले घटक जर जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये पुरेशा प्रमाणात असतील तर त्या शेतीमध्ये किंवा त्या मातीमध्ये पिक चांगल्या प्रकारे येते व उत्पादन देखील भरघोस मिळते. जमिनीची सुपीकता चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातून मातीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असणे खूप गरजेचे असते.
जेव्हा मातीमध्ये सेंद्रिय कर्ब पुरेशा प्रमाणात असते तेव्हा आपण पिकांना देत असलेले मुख्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य यांचा फायदा पिकांना होतो. तसेच पिकांसाठी उपयुक्त असणाऱ्या जिवाणूंसाठी देखील सेंद्रिय कर्ब हा एक महत्त्वाचा घटक आहे.
इतकेच नाहीतर जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी देखील व माती भुसभुशीत ठेवण्यासाठी देखील सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा असतो. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जर बघितले तर तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते व त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे ऑक्सिडेशन होते.
सूर्याची प्रचंड उष्णता आणि प्राणवायू इत्यादीमुळे देखील सेंद्रिय कर्बाचे ज्वलन होते. जर आपल्याकडील जमिनीत असलेली एकूण सेंद्रिय कर्बाची मात्रा बघितली तर ती 0.2% ते 0.6% म्हणजेच अतिशय कमी आहे.
सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे
मातीमधील जर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवायचे असेल तर रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा जितका जास्त वापर करता येईल तितका करावा. तसेच पिकांच्या अवशेषांचे आच्छादन म्हणून वापर करणे गरजेचे आहे व अवशेष न जाळता त्यांना जमिनीमध्ये गाडण्याला प्राधान्य द्यावे. तसेच ताग किंवा धैचा किंवा बोरू सारखे पिके घेऊन ते जमिनीत गाडावेत.
मृदा व जलसंधारणाचे उपाय करून जमिनीची धूप टाळण्याचा प्रयत्न करावा. जमिनीची पूर्व मशागत करताना जेव्हा वखराची शेवटची पाळी देतात त्या अगोदर सेंद्रिय किंवा कंपोस्ट खतांचा वापर करावा. जास्तीत जास्त प्रमाणात जैविक खतांचा वापर करावा व त्यांचा वापर शेणखतात मिसळून किंवा बीजप्रक्रिया करतांना करावा.
तसेच खत व्यवस्थापन करताना खतांची संतुलित मात्रा द्यावी व ती देताना योग्य प्रकारे व योग्य वेळी देण्याचा प्रयत्न करावा. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा.
जैविक गुणधर्म सुधारण्याकडे लक्ष द्यावे
1- जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जीवाणू असतात ते सेंद्रिय पदार्थ कुजवतात व पिकाला अन्नपुरवठा करण्याचे काम करतात.
2- सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची जी काही क्रिया असते त्यातून अनेक सेंद्रिय आम्ल तसेच संजीवके व पिकांच्या वाढीकरिता आवश्यक असणारे पदार्थ तयार होत असतात.
3- तसेच जमिनीतील वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाच्या माध्यमातून ऊर्जा पुरवली जाते व त्यामुळे जिवाणूंची कार्यक्षमता चांगली होऊन पिकांना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढण्यास मदत होते.