Online Ration Card News : शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब कुटुंबांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही देखील अशीच एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील रेशन कार्ड धारकांना शासनाच्या माध्यमातून रास्त भावात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे कोरोना काळापासून रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे.
त्यामुळे गरीब कुटुंबांना याचा मोठा फायदा होत आहे. मात्र शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे मोफत अन्नधान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय रेशन कार्डचा उपयोग अनेक महत्त्वाच्या शासकीय कामांमध्ये देखील होतो.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक असते. विद्यार्थ्यांना देखील अनेक शैक्षणिक कामांमध्ये रेशन कार्डची गरज भासत असते. स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, ऍडमिशन घेताना, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक असते.
खरं तर आधी रेशन कार्ड बनवण्यासाठी पुरवठा विभागाकडे जावे लागत असे. शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारून सर्वसामान्य बेजार होत असत. तरीदेखील नवीन रेशन कार्ड मिळत नसे. आता मात्र रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रोसेस खूपच सोपी झाली आहे.
आता घरबसल्या रेशन कार्ड साठी अर्ज करता येत आहे. तथापि ऑनलाईन रेशन कार्ड साठी अर्ज कसा करायचा याबाबत अनेकांना माहिती नाहीये. यामुळे आज आपण ऑनलाइन रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची सविस्तर प्रोसेस अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
घरबसल्या रेशन कार्ड साठी अर्ज कसा करायचा?
घरबसल्या रेशन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर लॉगिन करावे लागणार आहे.
मग तुम्हाला अप्लाय ऑनलाइन फॉर्म रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करायचे आहे. रेशन कार्ड साठी अर्ज करताना आयडी प्रुफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
तसेच अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. तसेच यासाठी पैसे सुद्धा भरायचे आहे. पैसे भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर मग तुमच्या अर्जावर कारवाई सुरू होईल. फिल्ड व्हेरिफिकेशन केले जाईल. यात तुमचा अर्ज योग्य ठरल्यास, तुमचं रेशन कार्ड तयार होणार आहे.