Onion Rate : काल विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा करण्यात आला. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त. दरवर्षी महाराष्ट्रात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन लाल कांद्याची आवक होत असते. यंदाही दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील अनेक बाजारांमध्ये नवीन कांद्याची आवक झाली.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समितीत तसेच खारी फाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.
विजयादशमीच्या दिवशी बहुतांशी व्यापारी नवीन लाल कांद्याची खरेदी करून नवीन हंगामातील व्यापाराची सुरुवात करत असतात. यावर्षीही विजयादशमीच्या मुहूर्तावर उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन लाल कांदा खरेदी सुरू करण्यात आली.
या मार्केटमध्ये काल सकाळी दहा वाजता विक्रीस आलेला नवीन लाल कांदा खरेदी- विक्रीचा शुभारंभ झाला. बाजार समिती प्रशासनाच्या उपस्थितीत हा लिलाव करण्यात आला.
यावेळी नवीन लाल कांद्याला उमराणे एपीएमसी मध्ये ६ हजार १६२ रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. मात्र जिल्ह्यातील खारीफाटा येथील रामेश्वर मार्केटमध्ये नवीन कांद्याला 7101 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याला विक्रमी दर दिला जातो. कालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि खारीफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत. मात्र हा भाव मुहूर्तावर देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हाच भाव गृहीत धरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
एकंदरीत, बाजारात आता नवीन कांद्याची आवक होऊ लागली आहे. आगामी काळात नवीन कांद्याची आवक आणखी वाढणार आहे. नवीन कांद्याला महूर्तावर चांगला विक्रमी भाव मिळाला आहे यात शंकाच नाही.
पण मुहूर्तावर मिळालेला भाव हा ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे आगामी काळात कांद्याची आवक वाढल्यानंतर बाजारभावावर काय परिणाम होणार, बाजार भाव कायम राहणार की घसरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.