Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एका गोष्टीची विशेष चर्चा पाहायला मिळाली. ती म्हणजे टोमॅटोच्या बाजारभावात झालेली ऐतिहासिक वाढ. टोमॅटोला कधी नव्हे तो विक्रमी भाव मिळाला होता. किरकोळ बाजारात टोमॅटो शंभर रुपये प्रति किलो पेक्षा अधिक दरात विकला गेला.
यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट पूर्णपणे बिघडले होते. महागाईच्या मुद्द्यावर केंद्र शासनाला लक्ष केले जात होते. सर्वसामान्य गृहिणींचे बजेट यामुळे पूर्णपणे बिघडले होते आणि यामुळे सरकार बॅकफुटवर आले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोला विक्रमी भाव मिळाला म्हणून काही शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा देखील झाला होता.
जवळपास एक ते दीड महिना टोमॅटोच्या बाजारभावाची लाली कायम होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव चांगलेच स्थिर झाले आहेत. टोमॅटो घाऊक बाजारात दहा ते पंधरा रुपये प्रति किलोवर येऊन ठेपला आहे. यामुळे मात्र सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना वसूल करता येत नसल्याचे दृश्य आहे.
यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा शासनावर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणखी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा विक्रमी वाढ नमूद केली जात आहे. गेल्या काही दिवसांच्या काळात किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या दरात विक्री होणारा कांदा आता 40 रुपये प्रति किलो या दरात विकला जात आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिक परेशान झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. खरंतर सध्या नवरात्र उत्सवाचा काळ आहे. या काळात अनेक लोकांचे उपवास असतात. शिवाय नवरात्रोत्सवाच्या काळात कांदा आणि लसूण अनेक लोक खात नाहीत. यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात कांद्याची मागणी नेहमीच कमी होताना पाहायला मिळते. पण सध्या स्थितीला परिस्थिती थोडीशी भिन्न पाहायला मिळत आहे.
नवरात्र उत्सवाच्या काळातही कांद्याची मागणी कमी झालेली नाहीये. बाजारात कांद्याचा पुरवठा कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून सध्या बाजारभावात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. हॉटेलमध्ये उपयोगात येणारा लाल कांदा आणि सर्वसामान्य लोकांच्या घरात उपयोगात येणारा पांढरा कांदा दोन्हीच्या बाजारभावात किरकोळ बाजारात वाढ पाहायला मिळत आहे.
वास्तविक यावर्षी कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. कमी पावसामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. शिवाय उन्हाळी हंगामातील कांदा देखील आता संपत चालला आहे. यामुळे बाजारात चांगल्या दर्जाच्या मालाचा शॉर्टेज पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे येत्या काही दिवसात दिवाळीचा सण सुरू होणार असल्याने मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवस कांद्याचे बाजार भाव तेजीतच राहतील असा अंदाज तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
पण कांद्याच्या दरांमध्ये झालेली ही वाढ विक्रेत्यांनी केलेल्या कार्टेलिंगचा परिणाम असल्याचे मत काही बाजार अभ्यासकांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आले आहे. म्हणून कांद्याच्या वाढलेल्या दरांचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.