Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संबंध देशात कांद्याच्या दरात वाढ होत आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारात कांद्याच्या सरासरी बाजारभावाने दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. काही बाजारात 2500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक सरासरी भाव मिळत आहे. तर काही ठिकाणी कमाल बाजारभावाने 3,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे.विशेष म्हणजे पुढल्या महिन्यात कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची शक्यता असून किरकोळ बाजारात कांद्याचे दर 60 ते 70 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे. कांद्याची आवक कमी होणार असल्याने बाजारभावात विक्रमी वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे.हेच कारण आहे की, कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आत्तापासूनच तयारी केली जात आहे. केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बफर स्टॉक मधील तीन लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.पण केंद्र शासनाच्या निर्णयाचा कांद्याच्या बाजारभावावर फारसा विपरीत परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे देशाला दररोज 50 हजार टन कांदा लागतो. याचाच अर्थ नाफेडचा कांदा फक्त सहा दिवस पुरेल. यामुळे या बफर स्टॉक मधील कांद्याचा कांदा बाजार भावावर विपरीत परिणाम होणार नाही हे मात्र नक्की.शासनाच्या या निर्णयामुळे बाजारभावावर विपरीत परिणाम होणार नसला तरी देखील काल घेतलेल्या एका निर्णयामुळे कांद्याचे दर गडगडणार असे सांगितले जात आहे. काल केंद्र शासनाने कांदा निर्यात शुल्क 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कांदा निर्यात मंदावणार आहे.कांदा निर्यात कमी झाली तर साहजिकच याचा विपरीत परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारभाव कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी सामूहिक आवाज बुलंद केला आहे.अशातच आज झालेल्या लिलावात राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारात कांद्याला तब्बल चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. परंतु शासनाच्या निर्णयानंतर राज्यातील काही बाजारात कांद्याचे भाव गडगडले आहेत.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव?महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज 21 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.आज या मार्केटमध्ये कांद्याची 309 क्विंटल एवढी आवक झाली होती. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1 हजार रुपये प्रति क्विंटल, कमाल 4500 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.