Onion Rate : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या रणधुमाळीत देशभरातील कांदा उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा प्रचंड रोष पाहता कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. आज पासून कांदा निर्यात सुरू होणार आहे. केंद्र सरकारने काल याबाबतची अधिकृत नोटिफिकेशन जारी केली असून या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरं तर डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यात बंदी लावण्यात आली. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी कायम राहणार होती. परंतु मध्यंतरी 31 मार्चनंतर देखील निर्यात बंदी सुरूच राहणार अशा आशयाचे एक शासन परिपत्रक काढले गेले.
जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत ही निर्यात बंदी कायम राहणार असे सरकारने स्पष्ट केले होते. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये शासनाविरोधात कमालीची नाराजी पाहायला मिळाली.
दरम्यान ही नाराजी कमी करण्यासाठी मध्यंतरी शासनाने विविध मित्र राष्ट्रांना कांदा निर्यातीस परवानगी दिली. आठ दिवसांपूर्वी देखील केंद्रातील सरकारने सहा देशांना 99 हजार 250 मॅट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती.
याशिवाय गुजरात राज्यातील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला देखील परवानगी देण्यात आली. 2000 मॅट्रिक टन पांढरा कांदा निर्यात सरकारने परवानगी दिली होती. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांची नाराजी काही कमी होत नव्हती.
सरसकट कांदा निर्यात सुरू झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर काल केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.
कांदा निर्यातीसाठी कमीत कमी निर्यात मूल्य ५५० अमेरिकन डॉलर प्रति टन एवढे असायला हवे. म्हणजे निर्यातदारांना ४६ ते ४७ रुपये प्रति किलोच्या खाली कांदा विकता येणार नाही अशी अट लावून देण्यात आली आहे.
तसेच कांद्यावर ४० टक्के एक्स्पोर्ट ड्युटी देखील कायम ठेवण्याची देखील अट आहे. दरम्यान सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील काही बाजारांमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा पाहायला मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारात अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बाजारभावात पाचशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलची सुधारणा पाहायला मिळाली आहे. लासलगाव बाजार समिती कांद्याला मिळाला जास्तीत जास्त 2551 रुपये, तर सरासरी 2100 रुपये तर कमीतकमी 800 रुपये बाजार भाव मिळाला आहे.
तसेच आज लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल, कमाल 2452 प्रति क्विंटल आणि सरासरी 2250 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. शिवाय पेन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान 2400, कमाल 2600 आणि सरासरी 2400 रुपयाचा भाव मिळाला आहे.