Onion News : राज्यासहित संपूर्ण देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कांदा बाजार भाव वाढू शकतात अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने काल अर्थातच 15 एप्रिल 2024 ला एक मोठा निर्णय घेतला असून आता पुन्हा एकदा केंद्र सरकार आपल्या मित्र देशांना कांदा निर्यात करणार आहे.
केंद्र सरकारने काल श्रीलंकेला दहा हजार टन कांदा आणि संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) 10 हजार टन कांदा असा एकूण 20 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. खरेतर सध्या देशात कांदा निर्यात बंदी सुरू आहे. निर्यात बंदीचा निर्णय डिसेंबर 2023 मध्ये घेतला गेला आहे.
या निर्णयानुसार, 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार होती. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीला जोपर्यंत पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत मुदत वाढ देण्याचे जाहीर केले आहे.
मात्र निर्यात बंदीला मुदत वाढ दिली असली तरी सरकार आपल्या मित्र राष्ट्राना कांदा निर्यात करत आहे. भारत सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेशला ६४,४०० टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती.
तसेच भूतानला ५५० टन, बहरीनला ३ हजार टन, मॉरिशसला १२०० टन कांदा निर्यातला परवानगी देण्यात आली होती. आता बांगलादेश आणि भूतानला पुन्हा एकदा प्रत्येकी दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आधी UAE ला 24 हजार 400 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच श्रीलंकेला चाळीस हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी मिळाली होती. आता पुन्हा एकदा या दोन्ही राष्ट्रांना प्रत्येकी दहा हजार टन कांदा पाठवला जाणार असेल.
याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारकडून कालच निर्गमित झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊ शकते अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड या सरकारी कंपनीच्या माध्यमातून कांदा निर्यात होणार असल्याने याचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार हा विश्लेषणाचा भाग राहणार आहे.
हेच कारण आहे की, कृषी क्षेत्रातल्या जाणकार लोकांनी पूर्णपणे कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी यावेळी केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जर योग्य भाव हवा असेल तर कांदा निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दर मिळणार असे बोलले जात आहे.