Onion Market News : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. टोमॅटोचे वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे. नुकत्याच एका अहवालानुसार टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे व्हेज थाळी 28% आणि नॉनव्हेज थाळी 11 टक्के महाग झाल्याचे समोर आले आहे.
याचाच अर्थ टोमॅटोच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसवली आहे. दरम्यान आता टोमॅटोच्या बाजारभावा पाठोपाठ कांद्याचे देखील बाजार भाव कडाडणार असा अंदाज आहे.
खरंतर टोमॅटो समवेतच इतरही भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहेत. अशातच आता कांद्याचे देखील भाव विक्रमी वाढणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे येत्या काही दिवसात सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट अजूनच तंगीत येणार असल्याचे चित्र आहे.
किती वाढणार कांद्याचे भाव?
वास्तविक, फेब्रुवारीपासून ते जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना कांदा अगदी कवडीमोल दरात विकावा लागला होता. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले होते. कांदा पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता आला नव्हता. पण गेल्या जुलै महिन्यापासून कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आहे.
कांद्याच्या लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी १९०० रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे. विशेष म्हणजे या बाजारात कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळत आहे.
यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळू लागला आहे. अशातच आता कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदा किरकोळ बाजारात लवकरच 35 ते 40 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचणार आहे.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, पावसामुळे आणि पुरामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय खरीप हंगामातील कांदा लागवड खोळंबलेल्या मान्सूनमुळे लांबण्याची शक्यता आहे.
तसेच उन्हाळी हंगामातील कांदा पिकावर अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा विपरीत परिणाम झाला असल्याने आता शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात कांदा शिल्लक असून येत्या काही दिवसात कांद्याचे आवक कमी होईल आणि बाजारभावात वाढ होणार आहे.
म्हणजेच खरीप हंगामातील कांदा उशिराने बाजारात येणार असल्याने आणि उन्हाळी हंगामातील साठवलेला कांदा देखील आता खूपच कमी प्रमाणात शिल्लक असल्याने कांद्याचा शॉर्टेज तयार होण्याची शक्यता आहे.
यामुळे दरात वाढ होईल असा अंदाज आहे. निश्चितच कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली तर यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु सर्वसामान्यांना यामुळे अधिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो.