Onion Farming : महाराष्ट्रात कांदा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यात हे पीक खरीप, रांगडा आणि रब्बी अशा तीनही हंगामात उत्पादित होते. सध्या राज्यात रांगडा कांदा लागवड प्रगतीपथावर आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी खरीप हंगामातील कांदा शेतकऱ्यांना लावता आलेला नाही.
यामुळे रांगडा कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते. याशिवाय रब्बी हंगामात देखील यंदा कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रब्बी हंगामातील कांदा लागवड करण्यासाठी या चालू महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात रोपवाटिका तयार केली जाणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कांद्याच्या सर्वोत्कृष्ट जाती कोणत्या याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रब्बी हंगामासाठी कांद्याच्या सर्वोत्कृष्ट जाती खालीलप्रमाणे
भीमाशक्ती : रब्बी हंगामासाठी कांद्याची ही जात खूपच उपयुक्त ठरते. राज्यातील हवामान या जातीस मानवते. या जातीचा कांद्याचा रंग लाल असतो. लागवडीनंतर साधारणता 125 ते 130 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते आणि हेक्टरी 28 ते 30 टन पर्यंतचे उत्पादन मिळते. या कांद्याची टिकवण क्षमता पाच ते सहा महिन्यांपर्यंतची आहे.
भीमा किरण : ही देखील महाराष्ट्रात उत्पादित होणारी रब्बी हंगामातील एक प्रमुख कांद्याची जात आहे. या जातीचे पीक 125 ते 135 दिवसात परिपक्व बनते. या जातीपासून 28 ते 32 टन प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. या जातीचा कांदा काढणीनंतर जवळपास पाच ते सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतो. यामुळे रब्बी हंगामात याही जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये हा वाण विशेष लोकप्रिय ठरला आहे.
भीमा रेड : हा देखील रब्बी हंगामासाठी एक उपयुक्त वाण आहे. शेतकऱ्यांमध्ये हा देखील वाण विशेष लोकप्रिय बनला आहे. लागवड केल्यानंतर सरासरी 110 ते 120 दिवसात पीक परिपक्व बनते. सरासरी 30 ते 32 प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा केला जातो.