Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी हाती आलीये. ही देशातील पहिली भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही मेक ईन इंडिया परियोजनांतर्गत तयार करण्यात आलेली हाय स्पीड ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. तेथे प्रवाशांनी या गाडीला चांगला प्रतिसाद दाखवला.
यानंतर, मग टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्रालाही आठ वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
मात्र सध्या जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे ती चेअरकार प्रकारातील आहे. येत्या काही दिवसांनी वंदे भारत एक्सप्रेसचा शयनयान प्रकार देखील लाँच होणार आहे. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही सर्वप्रथम मुंबई ते बरेली या मार्गावर चालवली जाईल अशी दाट शक्यता आहे. याशिवाय मुंबई ते दिल्ली, पुणे ते दिल्ली या मार्गावरही स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असा दावा केला जातोय.
दरम्यान, दिवाळीच्याआधी मध्यप्रदेश येथील भोपाळ स्थित राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरून तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब अशी की यातील एक गाडी चेअरकार प्रकारातील राहणार आहे आणि उर्वरित वंदे भारत स्लीपर ट्रेन राहतील. भोपाळ ते मुंबई दरम्यान सुद्धा वंदे भारत सुरू होणार असा दावा होत आहे.
कोणत्या मार्गावर धावणार ?
राणी कमलापती रेल्वे स्टेशन वरून मुंबईसाठी 16 कोच असणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे. पाटणासाठी देखील वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे. मात्र लखनऊ साठी राणी कमलापती रेल्वे स्टेशन वरून आठ कोच असणारी चेअरकार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल असा दावा केला जातोय.
याशिवाय राणी कमलापती रेल्वे स्टेशन ते नवी दिल्ली दरम्यान सध्या सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दोन स्लीपर कोचं जोडले जातील अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे या तीन नवीन गाड्या दिवाळीच्या आधीचं सुरू होणार आहेत. या गाड्या भोपाळ रेल्वे मंडळाला पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये मिळणार अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.