Pm Kisan Scheme New Rule:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजनांपैकी एक योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.
शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी योजना असून या योजनेची सुरुवात साधारणपणे डिसेंबर 2018 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली होती व तेव्हापासून आतापर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे.
परंतु या योजनेच्या लाभासाठी ज्या काही अटी व शर्ती आहेत त्यामध्ये अनेकदा बदल करण्यात आलेले आहेत. अशा बदलांमुळे बरेच शेतकरी या योजनेच्या मिळणाऱ्या लाभापासून आता दूर जाताना दिसून येत आहेत.
त्यातच आता पीएम किसान योजनेच्या संदर्भात जर बघितले तर केंद्र सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत व त्यामुळे आता बऱ्याच जणांचा पत्ता या योजनेतून कट होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच मिळणार लाभ
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे व त्यानुसार आता एकाच कुटुंबांमधील पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी असे लाभ घेत असतील तर यापुढे एका कुटुंबातील एकाच सदस्याला फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तसेच आता या योजनेसाठी जे शेतकरी नवीन अर्ज करतील त्यांना अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे.
जेव्हा या योजनेची सुरुवात झाली होती त्यावेळी एकाच कुटुंबातील पती किंवा पत्नी तसेच मुले यांच्या नावावर जर शेतजमीन असेल म्हणजेच एकापेक्षा जास्त जणांच्या नावाने सातबारा असेल तर अशा सगळ्यांनी या योजनेकरिता अर्ज केले होते व सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता.
तसेच या योजनेमध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच आयकर भरणारे, डॉक्टर, वकील, इंजिनीयर, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट सारख्या व्यवसायात असणारे व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेत होते. परंतु आता एक केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली व यामुळे आता अनेक जणांचा या योजनेतून पत्ता कट होणार आहे व जे वास्तविक पात्र शेतकरी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
केवायसी करता अवघे सात दिवसांची मुदत
पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत अशा लाभार्थींची यादी कृषी विभागाकडे पडताळणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व यामध्ये जे लाभार्थी पात्र असूनही त्यांचे नाव जर अपात्र यादीमध्ये आलेले असेल
तर अशा शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून पात्रतेसाठी जी काही आवश्यक कागदपत्र असतील ती जमा करणे गरजेचे आहे व संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची यादीची पडताळणी करून सात दिवसात कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे व त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची यादी अपात्र म्हणून शासनास कळविण्यात येणार आहे.
त्यामुळे लाभार्थी या योजनेस पात्र होणार नाहीत असे देखील कृषी विभागाच्या माध्यमातून कळविण्यात आली आहे. त्यामुळे केवायसी करून घेणे खूप गरजेचे आहे. पात्र असून जर अपात्र लाभार्थी यादीमध्ये नाव असेल तर कागदपत्रांची पूर्तता करणे देखील तितकेच गरजेचे आहे.
काय आहेत आता नवीन नियम?
पीएम किसान योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे व त्यानुसार लाभार्थीच्या नावावर 2019 पूर्वी जमिनीची नोंद असणे गरजेचे आहे व एवढेच नाही तर 2019 नंतरची जमीन खरेदी, जमिनीचे खातेफोड तसेच बक्षीसपत्र असेल तर त्यांना लाभ दिला जाणार नाही.
परंतु लाभार्थीच्या नावावर एक फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाली असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच कुटुंबातील पती किंवा पत्नी, मुलगा आणि मुलगी यापैकी एकच व्यक्ती आता लाभ घेऊ शकणार आहेत.
तसेच लाभार्थी शासनाचा निवृत्तीवेतनधारक नसावा व नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनीयर तसेच सीए व आर्किटेक्ट नसावा. तसेच नोंदणीकृत व्यवसाय असणारा, सलग आयटी रिटर्न, इन्कम टॅक्स भरणारा देखील नसावा. तसेच लाभार्थी हा आजी-माजी खासदार किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष देखील नसावा. अशा प्रकारचे नवीन नियम आता या योजनेच्या संदर्भात करण्यात आले आहेत.