Nanded Jalna Expressway : समृद्धी महामार्गाचा नुकताच नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा वाहतूकीसाठी खुला झाला आहे. दरम्यान डिसेंबर 2023 पर्यंत या महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई पूर्ण करण्याचे टार्गेट आहे.
अशातच समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना महामार्गाबाबत एक मोठा अपडेट हाती आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला आता गती लाभली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच पद्धतीने नांदेड जालना महामार्ग माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जाते. हेच कारण आहे की चव्हाण यांनी या महामार्गासाठी कायमच पाठपुरावा केला आहे.
या महामार्गाची घोषणा गेल्या सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली होती. हा महामार्ग जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मराठवाड्यातील दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग एक गेमचेंजर सिद्ध होणार आहे.
हा महामार्ग जालना जिल्ह्यातील 29 गावातून जाणार असून जिल्ह्यात महामार्गाची लांबी 66 किलोमीटर एवढी राहणार आहे. यासाठी तेथील 654 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जिल्ह्यात पाणशेंद्रा या ठिकाणी महामार्गासाठी इंटरचेंज राहणार आहे.
आता या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रियला गती मिळाली आहे. सध्या जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया येत्या काही दिवसात पार पडणार आहे. याबाबत आज विजय राठोड एक महत्वपूर्ण अशी बैठक आयोजित करणार आहेत. अशी माहिती तहसीलदार एल डी सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे.
बाजार मूल्यापेक्षा पाचपट मोबदला
भूसंपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मूल्यांकनासाठी 2013 च्या भूसंपादन कायद्याचा आधार घेतला जाणार आहे. या कायद्यानुसार भूसंपादनाचे दर फिक्स होणार आहेत. यानुसार संबंधित गावातील गेल्या तीन वर्षाचे जमिनीचे व्यवहार तपासले जातील. त्यानुसार सरासरी दर निश्चित केला जाईल. अशा पद्धतीने जमिनीचे बाजार मूल्य ठरवले जाणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या जमीनदारांनी संमती दर्शवली तर त्यांना बाजार मूल्यापेक्षा पाचपट अधिक मोबदला मिळणार आहे. मात्र यांना अपील करता येणार नाही. तसेच जे शेतकरी बांधव संमती दर्शवणार नाहीत त्यांना चारपट अधिक मोबदला मिळणार आहे मात्र यांना अपील करता येईल.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, हा महामार्ग जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यात 36 किलोमीटर लांबीचा राहणार असून एकूण 16 गावात जाणार आहे आणि 355 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
तसेच परतुर तालुक्यात हा महामार्ग 9.32 किलोमीटर लांबीचा राहणार असून एकूण तीन गावातून जाणार आहे आणि यासाठी 80 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. याशिवाय मंठा तालुक्यात 21.14 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राहील आणि तालुक्यातील एकूण दहा गावातून हा महामार्ग प्रस्तावित आहे, यासाठी तालुक्यातील 218 हेक्टर जमीन संपादित होणार आहे.