Nagpur Goa Shaktipith Expressway : सध्या महाराष्ट्रात नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या खूपचं चर्चा सुरु आहेत. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यापैकी 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून हा भाग वाहतुकीसाठी सुरू देखील करण्यात आला आहे.
नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्गाचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. उर्वरित इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा मार्गही येत्या काही दिवसांनी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. हा महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई हा प्रवास अतिशय जलद आणि आरामदायी होणार आहे.
दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्रस्तावित करण्यात आलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीलाच ग्रहण लागले आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी असा सहा पदरी महामार्ग बांधणे प्रस्तावित आहे. या सहा पदरी महामार्गामुळे राज्यातील बारा जिल्हे जोडले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत. हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने याला शक्तीपीठ असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गाला राज्य शासनाची मंजुरी मिळालेली असून याच्या भूसंपादनाची कारवाई देखील सुरू करण्यात आली होती.
मात्र या महामार्गात शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी बाधित होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाचा कडाडून विरोध सुरू केला आहे. यासाठी शेतकरी आणि बाधित जमीन मालकांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जन आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, याच आंदोलनाची दखल घेत वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने या महामार्गासाठी सुरू करण्यात आलेले भूसंपादन तात्काळ थांबवण्याचे निर्देश जारी केले आहेत. मात्र असे असले तरी हा महामार्ग सपशेल रद्द करावा यासाठी अजूनही शेतकऱ्यांचे जन आंदोलन सुरूच आहे.
शेतकरी नेत्यांनी आणि विपक्ष तथा सत्ताधाऱ्यातील नेत्यांनी देखील या महामार्गाची गरज नसल्याचे म्हटले आहे. यामुळे हा महामार्ग रद्द होणार का? यासंदर्भात शिंदे सरकार काय निर्णय घेणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. अशातच मात्र आता या विवादित शक्तीपीठ महामार्गाला काही शेतकऱ्यांनी समर्थन दाखवले आहे.
या बाधित शेतकऱ्यांनी आम्ही शक्तिपीठ महामार्गास जमिनी देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्यांनी या महामार्ग प्रकल्पाला जमिनी देण्यास सहमती दाखवली आहे. आमच्या जमिनी संपादित करून जमिनीला योग्य मोबदला द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली असून या महामार्गाला समर्थन दिले आहे.
विशेष म्हणजे याबाबतचे निवेदन त्यांनी सांगोलाचे तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. शक्तीपीठ महामार्ग सांगोला तालुक्यातील मेथवडे, चिंचोली, एखतपुर, अजनाळे, यलमर मंगेवाडी, नाझरे, चोपडी इत्यादी गावांमधून जात पाचेगाव बुद्रुक मधून पुढे जाणार आहे.या महामार्गासाठी सरकारने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले असून खुणा गाडल्या असल्याचे दिसते.
चिंचोली येथील बाधित शेतकऱ्यांच्या मते हा महामार्ग सांगोला तालुक्यातून गेल्यास येथील विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे नवीन उद्योग-व्यवसाय सुरू होतील आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल असा विश्वास येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. एकंदरीत चिंचोली येथील शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळाला तर आम्ही शक्तिपीठ महामार्गाला आमच्या जमिनी देऊ असे म्हटले आहे.