Mumbai Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन 2019 मध्ये रेल्वेच्या ताफ्यात आली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील विविध मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या आठ मार्गांवर ही वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
अर्थातच राजधानी मुंबईला आत्तापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. यातील काही गाड्या राजधानी मुंबईला देखील मिळणार आहेत.
कोणत्या मार्गांवर सुरू होणार वंदे भारत ट्रेन
मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील मुंबई ते शेगाव, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर, पुणे ते वडोदरा, पुणे ते बेळगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद अशा विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.
या मार्गांवर वंदे भारत सुरू होणार की नाही याचा निर्णय मात्र रेल्वे बोर्ड घेणार आहे. रेल्वे बोर्डाकडून अजून याबाबतची माहिती समोर आलेली नाही. परंतु लवकरच या वंदे भारत गाड्या रुळावर धावतील अशी आशा व्यक्त होत आहे.
या वंदे भारतचा स्पीड वाढणार
अशातच, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद यादरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस चा स्पीड वाढणार आहे. पश्चिम रेल्वेला (WR) या वंदे भारत एक्स्प्रेसची कमाल 160 किमी प्रतितास (kmph) या वेगाने चाचणी करण्यास मंजुरी मिळाली आहे.
सध्या ही ट्रेन ताशी 130 किमी वेगाने धावते. यामुळे 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने या गाडीची जर यशस्वी ट्रायल झाली तर भविष्यात ही गाडी 160 किलोमीटर या वेगाने धावेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. असे झाल्यास, प्रवाशांचा प्रवास वेळ सुमारे 45 मिनिटांनी कमी होणार आहे.
म्हणजेच भविष्यात मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा आयोगाने रविवारी मुंबई सेंट्रल-बडोदा-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनच्या 16 डब्यांच्या ट्रेनच्या सेटची कन्फर्मेट्री ऑसिलोग्राफ कार रन (सीओसीआर) करण्यासाठी मंजुरी प्रदान केली आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्त (वेस्टर्न सर्कल) यांनी नवीन डिझाइन प्रोपल्शन सिस्टम आणि बोगीसह ट्रेनच्या सीओआरसी चाचण्या घेण्यास होकार दर्शवला आहे. 160 km प्रती तास या वेगाने सीओआरसी चाचणी घेतली जाणार आहे.
यामुळे आता साऱ्यांचे लक्ष या चाचणी कडे लागलेले आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर भविष्यात मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकणार आहे.