Mumbai Trans Harbour Link Project : गेल्या काही वर्षात राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची प्रकल्प पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तर काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून फक्त उद्घाटन बाकी आहे.
यामध्ये मुंबईमधील महत्त्वाकांशी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पाला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू विकसित होत आहे. या अंतर्गत शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान सागरी ब्रिज तयार होणार आहे. हा मार्ग एकूण 22 किलोमीटर लांबीचा अन सहा पदरी ब्रिज राहणार आहे.
यापैकी 16.80 किलोमीटर लांबीचा समुद्रावर राहील तर उर्वरित मार्ग हा जमिनीवर राहणार आहे. परिणामी हा देशातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल म्हणून ओळखला जाणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 18,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून यामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त 20 ते 25 मिनिटात पूर्ण होणार असा दावा केला जात आहे.
या मार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर देखील फक्त दीड तासात अर्थातच 90 मिनिटात पूर्ण होईल असे जाणकारांनी सांगितले आहे. यामुळे निश्चितच मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरे तर हा अटल सेतू गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू करण्याचा प्लॅन राज्य शासनाने आखला होता. 25 डिसेंबरला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस असतो यामुळे याच दिवशी या प्रकल्पाचे उद्घाटन व्हावे अशी राज्य शासनाची इच्छा होती.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व आवश्यक प्रक्रिया देखील पूर्ण केली होती. मात्र, या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही परिणामी या प्रकल्पाचे उद्घाटन आता 12 जानेवारी 2024 ला करण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले आहे.
म्हणजेच या पुलाचे आता उद्या उद्घाटन होणार आहे. पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर हा पूल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. मात्र या पुलावरुन दुचाकी, ट्रॅक्टर आणि ऑटोरिक्षाला प्रवासास परवानगी नाकारण्यात आली आहे.
म्हणजेच या वाहनांना मुंबई ट्रान्स हार्बर लिंकने प्रवास करता येणार नाही. तसेच या मार्गावरुन प्रवास करतांना ताशी 100 किमी वेग मर्यादा पाळावी लागणार आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अडीचशे रुपये एवढा टोल देखील भरावा लागणार आहे.