Mumbai To Thane Metro : गेल्या काही दशकापासून मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहेत. वाहतूक कोंडीमुळे मुंबईमध्ये प्रवास करणे खूपच आव्हानात्मक काम बनले आहे. मुंबई हे जगातील सर्वात व्यस्त शहरांमधील एक शहर आहे. शहराची लोकसंख्येची घनता देखील खूपच जास्त आहे. यामुळे येथे दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे मुंबई शहरात आणि उपनगरात विविध पायाभूत सुविधाविकसित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
विशेषता दळणवळण सुविधा मजबूत करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुंबई आणि ठाण्याला जोडण्यासाठी देखील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाची उभारणी केली जात आहे. हा मेट्रो मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच MMRDA च्या माध्यमातून तयार केला जात आहे. ठाणे आणि मुंबईला जोडणारा हा मेट्रो मार्ग मेट्रो 4 म्हणून ओळखला जात आहे.
या मार्गाचे काम एकूण दोन टप्प्यात केले जात असून लवकरच या मार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. या मार्गाचा पहिला टप्पा हा घोडबंदर ते मुलुंड दरम्यानचा आहे. घोडबंदर ते मुलुंड पर्यंतच्या या पहिल्या टप्प्याबाबत एमएमआरडीएने एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. एम एम आर डी ए ने सांगितल्याप्रमाणे हा पहिला टप्पा 2025 पर्यंत तयार केला जाणार आहे.
पण या मार्गावर प्रवासी वाहतूक 2026-2027 दरम्यान सुरु होणार आहे. या पहिल्या टप्प्याचे मेट्रो मार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यासोबतच स्थानकाच्या उभारणीचे कामही वेगाने सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील अनेक स्थानकांचे सिव्हिल काम 50 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या मार्गांवरील स्थानकांच्या फिनिशिंगचे काम देखील आता लवकरच सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्या अंतर्गत मुलुंड अग्निशमन केंद्र, मुलुंड नाका, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महानगर पालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन आणि माडीवाडा ही सात स्थानके तयार होणार आहेत. यासाठी 198 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
विशेष म्हणजे फिनिशिंगच्या कामासाठी लवकरच निविदा निघणार आहेत. विशेष बाब म्हणजे या मार्गावर ट्रॅक टाकण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार असून नियुक्तीचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. खरतर वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो 4-ए विकसित केला जात आहे. या मार्गांसाठी मोगरपाडा येथे कारशेड तयार होणार आहे.
कारशेडसाठी तब्बल 905 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र गेल्या वर्षापर्यंत कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे या मार्गाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. यामुळे एमएमआरडीएने आता या कामासाठी उपकंत्राटदार नेमला आहे. दरम्यान या निर्णयामुळे मेट्रोच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. यामुळे आता येत्या काही वर्षात मुंबई ते ठाण्याला जोडणारा हा मेट्रो मार्ग लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.