Mumbai Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये लोकलचे जाळे विकसित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. राजधानी मध्ये आणि राजधानी लगत वसलेल्या उपनगरांमध्ये रेल्वेचे विविध मार्ग विकसित करण्यात आले आहेत. खरतर, लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखले जाते.
मात्र गेल्या अडीच दशकांपासून प्रस्तावित करण्यात आलेला नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही. हा रेल्वे मार्ग जवळपास 26 वर्षांपासून रखलला आहे. सध्या स्थितीला नेरुळ ते उरण रेल्वे मार्गापैकी नेरूळ ते खारकोपर रेल्वे मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू आहे. मात्र खारकोपर ते उरण हा या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा असून हा मार्ग अजूनही प्रवाशांसाठी सुरू झालेला नाही.
मात्र आता हा रेल्वे मार्ग लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खारकोपर ते उरण हा रेल्वे मार्ग येत्या आठवड्याभरात सुरू केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा रेल्वे मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटित केला जाणार आहे.
यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून थेट उरण पर्यंत लोकलने प्रवास करता येणे शक्य होईल असे चित्र तयार होत आहे. दरम्यान, हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर उरणकरांना वेळेत राजधानी मुंबईमध्ये प्रवेश करता येणार आहे. यामुळे दैनंदिन कामासाठी उरणवरून थेट मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कसा आहे प्रकल्प ?
नेरूळ ते उरण हा संपूर्ण 26.7 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग 1997 मध्ये मंजूर करण्यात आला होता. म्हणजेच आपल्यापैकी अनेकांचा जेव्हा जन्मही झालेला नसेल तेव्हा हा रेल्वे मार्ग मंजूर झाला. पण रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यावरही या रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास बराच काळ लागला.
काम सुरू झाल्यानंतर या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नेरूळ ते खारकोपर हा टप्पा 2018 मध्ये सुरू करण्यात आला. आता खारकोपर ते उरण या 14.6 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके उभारली गेली आहेत.
या पाचही स्थानकांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आता हा दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. वास्तविक, मार्चमध्ये खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गावरुन लोकल रेल्वे चालवून ट्रायल रन घेण्यात आली होती. मात्र, अद्याप या मार्गावर व्यावसायिक वाहतूक सेवा सुरू झालेली नाही. पण आता येत्या आठवड्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग सुरू केला जाणार आहे.