Mumbai Railway News : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राजधानी मुंबईमधील आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.
जस की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत आहे. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीटही मिळत नाहीये.
हेच कारण आहे की रेल्वे विभागाने नागरिकांच्या हितासाठी काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील एका महत्त्वाच्या अशा रेल्वे स्थानकावरून मराठवाड्यासाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालू केली जाणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने नवी मुंबई येथील पनवेल रेल्वे स्थानकावरून हुजूर साहेब नांदेडसाठी अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे चालवण्याचे जाहीर केले आहे.
यामुळे पनवेल ते नांदेड हा प्रवास गतिमान होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेचा हा निर्णय मोठा फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान, आता आपण पनवेल ते नांदेड दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत तसेच या गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०७६१६ ही ट्रेन उत्सव विशेष रेल्वेगाडी म्हणून पनवेल ते नांदेड दरम्यान चालवली जाणार आहे.
ही गाडी पनवेल येथून १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२० वाजता सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता पोहोचणार अशी माहिती मध्य रेल्वे करून मिळाली आहे.
तसेच गाडी क्रमांक ०७६१५ उत्सव विशेष रेल्वेगाडी हुजूर साहेब नांदेड ते पनवेल दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि पनवेल येथे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२० वाजता पोहोचणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा ?
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, पनवेल ते नांदेड दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या विशेष गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.