Mumbai Railway News : पुढील महिन्यात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. यंदा 12 नोव्हेंबर पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे. दरम्यान सणासुदीच्या काळात राजधानी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरंतर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. देशात दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. रेल्वेचा प्रवास हा कमी पैशात आणि अधिक जलद होत असल्याने या प्रवासाला नेहमीच पसंती दाखवली जाते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे खूप मोठे आहे. देशात असे एकही शहर नाही जे रेल्वेने जोडले गेलेले नाही.
त्यामुळे कुठेही प्रवास करायचा राहिला तर सर्वप्रथम रेल्वेला प्राधान्य दिले जाते. सणासुदीच्या काळात तर रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर आता रेल्वेच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे विभागाने राजधानी मुंबईहून दिवाळीच्या काळात विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान दिवाळीच्या काळात विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. ही रेल्वे एक नोव्हेंबर 2023 पासून चालवली जाणार आहे. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे. आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान चालवली जाणारी ही स्पेशल ट्रेन बुधवार, शनिवार आणि सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता गोव्यातील थिवी येथे पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी थिवी रेल्वे स्थानकावरून गुरुवार, शनिवार आणि मंगळवारी धावणार आहे. ही गाडी थिवी रेल्वे स्थानकावरून दुपारी तीन वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
कुठे मिळणार या गाडीला थांबा ?
कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या विशेष गाडीला या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. ही गाडी या मार्गावरील ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.