Mumbai Railway News : उद्या अर्थातच 15 ऑक्टोबर 2023 रोजी घटस्थापना आहे. म्हणजेच नवरात्र उत्सवाचा आरंभ होणार आहे. नवरात्र उत्सव 24 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. यानंतर पुढील महिन्यात 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीचा आनंददायी पर्व सुरु होणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या दिवसात राजधानी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मध्य रेल्वेकडून एक नवीन सुपरफास्ट ट्रेन सुरू केली जाणार आहे. मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान आणि नागपूर ते मुंबई दरम्यान द्विसाप्ताहिक ट्रेन चालवणार आहे.
ही विशेष गाडी 19 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. या गाडीच्या दोन्ही दिशेने एकूण 20 फेऱ्या या कालावधीत चालवल्या जाणार आहेत. यामुळे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा मिळणार आहे.
सणासुदीच्या काळात या दोन्ही शहरादरम्यानच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा हा निर्णय खूपच फायद्याचा ठरणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
सीएसएमटी-नागपुर द्वि साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
सीएसएमटी-नागपुर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 19 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर सोमवारी आणि गुरुवारी चालवली जाणार आहे. या नियोजित वेळेत ही गाडी CSMT येथून ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
तसेच नागपूर-सीएसएमटी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 21 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी चालवली जाणार आहे. ही गाडी या नियोजित वेळेत १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता CSMT येथे पोहोचणार आहे.
कुठे थांबणार ही स्पेशल ट्रेन
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि नागपूर दरम्यान चालवली जाणारी ही स्पेशल गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे निश्चितच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा मिळणार आहे.