Mumbai Railway : येत्या काही दिवसात चालू 2023 या वर्षाची सांगता होणार आहे. वर्ष 2023 आता निरोपासाठी तयार झाले आहे. यामुळे सरत्या वर्षाला गुड बाय करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील कानाकोपऱ्यात मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आतापासूनच स्वागतासाठी जल्लोष करण्याची तयारी सुरू झाली आहे.
सालाबादाप्रमाणे यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्याच्या दिशेने आगेकूच करणार आहेत. 31 डिसेंबरला एन्जॉय करण्यासाठी अन नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी राज्यातील नागरिक गोव्यात जात असतात. यामध्ये राजधानी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, याच मुंबईमधील लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असा निर्णय घेण्यात आला आहे.
डिसेंबर अखेरीस मुंबईहून गोव्यासाठी काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.खरं तर सध्या स्थितीला मुंबई ते गोवा असा प्रवास करण्यासाठी नियमित गाड्या आहेतच. पण डिसेंबर अखेरीस सालाबादाप्रमाणे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते गोवा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी डिसेंबर अखेरीस काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी आणि पनवेल ते करमळी या मार्गावर डिसेंबर अखेरीस विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती मध्ये रेल्वेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असेल वेळापत्रक ?
सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते थिवी, गोवा यादरम्यान २२ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक ०११५१) चालवली जाणार आहे. नववर्ष स्वागताला गोव्यात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी ही विशेष गाडी चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ही गाडी 22 डिसेंबर पासून सुरू होणार असली तरी यासाठीचे आरक्षण आज पासून अर्थातच 19 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. ही गाडी या नियोजित कालावधीत रोजाना रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून रवाना होणार आहे आणि थिवी, गोवा येथे सेम डे ला दुपारी दोन वाजता पोहोचणार आहे. तसेच थिवी ते सी एस एम टी विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक ०११५२) 22 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत चालवली जाणार असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ही गाडी या नियोजित कालावधीत दररोज चालवली जाणार आहे. दररोज दुपारी ३ वाजता थिवि येथून ही विशेष रेल्वेगाडी सुटणार आणि दुसर्या दिवशी पहाटे ३.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे या अतिशय महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार आहे.
याशिवाय, पनवेल ते करमळी यादरम्यान 23 डिसेंबर आणि 30 डिसेंबरला विशेष गाडी चालवली जाणार आहे. हे दोन्ही दिवस ही विशेष एक्सप्रेस ट्रेन पनवेल रेल्वे स्थानकावरून रात्री १० वाजता करमळी कडे रवाना होणार आहे आणि करमळीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता पोहोचणार आहे.
तसेच करमळी ते पनवेल विशेष एक्सप्रेस ट्रेन 23 आणि 30 डिसेंबरला चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी सकाळी ९.२० वाजता करमळी येथून सुटणार आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री सव्वा आठ वाजता पोहोचणार अशी माहिती समोर आली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नववर्षाच्या स्वागतासाठी चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.