Mumbai Pod Taxi : देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला बॉलीवूड नगरी, मायानगरी, स्वप्ननगरी अशा कित्येक नावाने ओळखले जाते. उद्योग, नोकरी, शिक्षण, पर्यटन तसेच मंत्रालयीन कामकाजासाठी या शहरात दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक येतात. अनेक लोक सिनेमात काम करण्याच्या इच्छेनेही या बॉलिवूड नगरीत पाय ठेवतात.
मात्र मुंबईत दाखल झाल्यानंतर जेव्हा कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रश्न उभा राहतो तेव्हा अंगावर शहारे येतात. कारण की, मुंबईची लोकसंख्या आणि येथे होणारी वाहतूक कोंडी, वाहनांची मुंग्यांप्रमाणे लागलेली लाईन या सर्व गोष्टी पाहून तोंडून आपसूक अरे देवा… असे उद्गार बाहेर पडतात.
मुंबईत वाहतुकीसाठी असंख्य पर्याय आहेत. यातील सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे लोकल. मात्र लोकलमध्ये नेहमीच मोठी गर्दी असते. या गर्दीमुळे लोकलमध्ये अपघात देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत.
यामुळे शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून आता मुंबई शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. मोनो ट्रेन सुद्धा सुरू आहे. यासोबतच मुंबईत कॅब अन रिक्षाची सर्विस देखील उपलब्ध आहे.
मात्र असे असले तरी अजूनही मुंबईतील वाहतूक कोंडी नियंत्रणात आलेली नाही. अशातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमध्ये आता पॉड टॅक्सी धावणार आहे.
कुठं धावणार पॉड टॅक्सी
मुंबईतील पहिली पॉड टॅक्सी वांद्रे ते कुर्ला मार्गावर चालवली जाणार आहे. यासाठी 1016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप तत्वावर राबवला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यांनी सुरू होईल आणि 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे.
म्हणजे या प्रकल्पासाठी आणखी तीन वर्षांची वाट पहावी लागणार आहे. मात्र जेव्हा हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा या पॉड टॅक्सी सेवेमुळे वांद्रे ते कुर्ला दरम्यान दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हैद्राबाद येथील ”साई ग्रीन मोबिलिटी” ही कंपनीला या प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. वांद्रे ते कुर्ला या 8.8 km लांबीच्या मार्गावर मुंबईतील पहिली पॉड टॅक्सी सूरु केली जाणार आहे.
कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक या दरम्यान या पॉड टॅक्सीचा मार्ग विकसित केला जाईल. या मार्गावर एकूण 38 स्थानके राहणार आहेत. या टॅक्सीचा वेग ताशी 40 किलोमीटर एवढा असेल. एका पॉड टॅक्सीने सहाजण प्रवास करू शकतील.