Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहरात आणि उपनगरात विविध विकासकामांनी जोर पकडला आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी शहरात मेट्रो सुरु केली जात आहे. लोकलचा विस्तार केला जात आहे.
तसेच काही रस्ते विकासाची देखील कामे केली जात आहेत. यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर मात्र 20 ते 22 मिनिटात कापता येणार आहे. सध्या स्थितीला हे अंतर पार करण्यासाठी एका तासापेक्षा अधिकचा वेळ खर्च करावा लागतोय.
मात्र या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत मोठे बचत होणार आहे. हा प्रकल्प फक्त मुंबईकरांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठीच फायदेशीर ठरेल असे नाही तर या प्रकल्पामुळे पुणेवासीयांचा देखील फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हे अंतर मात्र 90 मिनिटात पार होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
पुण्यातील लोणावळा खंडाळा आणि मुंबई दरम्यानचा प्रवास या प्रकल्पामुळे फक्त नव्वद मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे. दरम्यान मुंबई शहरातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. भाजपा महाराष्ट्राने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प 25 डिसेंबर 2023 रोजी सर्वसामान्यांसाठी खुला होणार अशी घोषणा केली आहे.
मात्र, प्रकल्पाचे काम करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेने या प्रकल्पाचे काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहे यामुळे 25 डिसेंबरला या प्रकल्पाचे उद्घाटन होणे जवळपास अशक्य असल्याचे सांगितले आहे. परिणामी या प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबत मुंबई आणि नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
कसा आहे प्रकल्प
या महत्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान सागरी सेतूची उभारणी केली जात आहे. या सागरी सेतूची 21.80 किलोमीटर एवढी लांबी आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई परस्परांना थेट जोडले जाणार आहे. खरे तर या प्रकल्पाचे काम सन 2018 मध्ये सुरू झाले.
काम सुरू झाल्यानंतर मात्र चार वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठेवले होते. म्हणजेच या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
तथापि, या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. आता मात्र डिसेंबर अखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचे 96 टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित काम डिसेंबर 2023 अखेरीस पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. अशातच, मात्र महाराष्ट्र भाजपाने ट्विटरवर हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 ला सुरू होणार अशी घोषणा केली आहे.
भाजपाने केलेल्या या घोषणेनंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी या विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे आता हा प्रकल्प 25 डिसेंबरला खरंच सुरू होणार का हा मोठा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.