Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शिवाय महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील धोकादायक पूल नव्याने विकसित करण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.
यात शहरातील डीलाईल पुलाचे देखील काम सुरू आहे. खरंतर पाच वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै 2018 मध्ये हा पूल असुरक्षित असल्याने बंद करण्यात आला होता. हा पूल बंद झाल्यामुळे मात्र या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे हा पूल लवकरात लवकर सुरू व्हावा अशी मुंबईकरांची इच्छा आहे.
अशातच मात्र या पूलासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पुलाचे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे. अर्थातच पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही महिन्यात या पुलाचे उद्घाटन होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकतो. तर एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये या पुलाचे उद्घाटन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यामुळे गणेशोत्सवात या पुलावरून मुंबईकरांना प्रवास करता येईल असा आशावाद आता व्यक्त होत आहे. वास्तविक हा पूल गेल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात सुरू होणार होता. सुरुवातीला 15 जुलैला या पुलाचे उद्घाटन होईल असे सांगितले जात होते.
यानंतर 31 जुलै पर्यंत हा पूल सर्वसामान्यांसाठी सुरू होईल असा दावा करण्यात आला. मात्र जुलै महिन्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलाचे काम थांबले होते. अशा परिस्थितीत हा पूल गेल्या महिन्यात सुरू होऊ शकला नाही. गेल्या महिन्यात जवळपास 20 दिवस या पुलाचे काम बंद होते, यामुळे याच्या बांधकामाला उशीर झाला आहे.
खरंतर या पुलाचा पहिला टप्पा जून 2023 मध्ये सुरू झाला आहे. परंतु याचा प्रवाशांना अपेक्षित असा फायदा होत नाहीये. मात्र या पुलाचा दुसरा टप्पा सुरू झाला तर येथील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे. करी रोड, चिंचपोकळी, लालबाग, भायखळा व एनएम जोशी मार्गावर राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
डिलाइल पुल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर डॉ. भीमराव आंबेडकर रोड, करी रोड आणि भायखळा ते चिंचपोकळीहून येणाऱ्या वाहनांना सुसाट प्रवास करता येणार आहे. यामुळे दादरसोबतच लोअर परेल ते पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात ये-जा करण्यास सोयीचे होणार आहे.
या सहा पदरी पुलाचे येत्या पंधरा दिवसात बहुतांशी काम पूर्ण होणार आहे. यामुळे गणेश चतुर्थी पर्यंत हा पूल खुला होईल असा दावा केला जात आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून याबाबत कोणतीच अधिकारीक माहिती हाती आलेली नाही. बीएमसीने अद्याप या पुलाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केलेली नाही.