Mumbai News : सध्या मुंबई, ठाणे सह संपूर्ण राज्यभरात विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. यात मुंबई शहरात आणि उपनगरात देखील विविध रस्ते विकासाची आणि पायाभूत विकासाची कामें हाती घेण्यात आली आहेत.
यामध्ये ठाणे ते बोरिवली हा प्रवास गतिमान करण्यासाठी आणि घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी ठाणे ते बोरिवली दरम्यान ट्वीन टनेल म्हणजे जुळे बोगदे विकसित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकल्पाच्या कामाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. राज्य वन्यजीव मंडळाने काल अर्थातच 20 ऑक्टोबर 2023 रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
कसा आहे प्रकल्प
खरंतर सध्या कितीला ठाणे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी घोडबंदर मार्गे जावे लागते. या प्रवासासाठी मात्र प्रवाशांना दीड ते दोन तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे. घोडबंदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने ठाणे ते बोरिवली हा प्रवास खूपच आव्हानात्मक बनला आहे.
हेच कारण आहे की, ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएने ठाणे ते बोरिवली दरम्यान ट्वीन टनेल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातं दुहेरी बोगदा विकसित केला जाणार आहे.
यासाठी जून महिन्यात कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्यास अडचणी येत होत्या. कारण की, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक होती. दरम्यान काल शुक्रवारी या प्रकल्पाला वनविभागाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
या प्रकल्पाला आता राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली असल्याने याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १०.२५ किमीचा बोगदा आणि १.५५ किमीचा पोहोचमार्ग विकसित केला जाणार आहे. या बोगद्याचा १३.०५ मीटरचा अंतर्गत व्यास राहणार आहे. दुहेरी बोगद्याची एकूण लांबी सुमारे १२ किमी एवढी असेल.
हा बोगदा ठाणे ते बोरिवलीदरम्यान ५.७४ किमी व बोरिवली ते ठाण्यादरम्यान ६.०९ किमी लांबीचा राहणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 15 हजार 734 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली हा दोन तासाचा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकल्पाला वन्यजीव मंडळाची मान्यता मिळाली असल्याने आता याचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार याकडे ठाणे आणि बोरिवली मधील नागरिकांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.