Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा ! ४.७ किलोमीटर लांबीचा आणखी एक बोगदा ! ऑक्टोबरपासून सुरु होणार काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पश्चिम उपनगरामध्ये गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्याचे प्रस्तावित आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया यशस्वी ठरली आहे. यामध्ये सर्वांत कमी किमतीची बोली जे कुमार- एनसीसी जेव्ही यांनी लावली आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रुझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र, दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ लक्षात घेता गोरेगाव-मुलुंड हा चौथा जोडरस्ता बांधण्याचा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्या या रस्त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अत्यंत कमी वेळात गाठणे शक्य तर होईलच, सोबत मोठ्या प्रमाणात इंधन बचत होईल.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सद्यस्थितीला पूर्व द्रुतगती महामार्गापासून ते खिंडीपाडा जंक्शन (अमरनगर, मुलुंड) आणि पश्चिम द्रुतगती मार्गापासून चित्रनगरी (गोरेगाव) दरम्यान या प्रकल्पांतर्गत रस्त्याची विविध कामे प्रगतिपथावर आहेत. चित्रनगरी (फिल्मसिटी) ते खिंडीपाडा जंक्शन या टप्यादरम्यान संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याचा भाग असल्याने हा टप्पा (मिसिंग लिंक) जोडण्यासाठी पालिकेने सविस्तर अभ्यास केला.

त्याच्या निष्कर्षानुसार हा टप्पा समांतर अशा जुळ्या आणि पूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या अर्थात भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून जोडण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्येकी तीन मार्गिका असणाऱ्या या जुळ्या बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. कारण हा बोगदा बांधणे हे आव्हानात्मक स्वरुपाचे काम आहे.

ही बाब लक्षात घेता, या बोगद्याच्या बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा जाहिरात प्रसिद्ध करून जागतिक स्तरावरच्या कंपन्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील, अशा रितीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जागतिक निविदा प्रकाशित करण्यात आली. ही निविदा प्रक्रिया आता यशस्वी झाल्याने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या बांधकामाला वेग येणार आहे, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नमूद केले.

दरम्यान, या संपूर्ण बोगदा साकारण्याचा कालावधी एकूण ६० महिन्यांचा म्हणजेच ५ वर्षांचा अपेक्षित असून, बोगद्याच्या कामाला ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले.

ठळक वैशिष्ट्ये

  • प्रस्तावित बोगद्याची लांबी प्रत्येकी ४.७ किलोमीटर
  • प्यास १३ मीटर अंतर्गत व्यास
  • कमाल वेग ८० किलोमीटर प्रतितास
  • तीन मार्गिका आणि पदपथ तसेच विविध यंत्रणांच्या वाहिन्या
  • संपूर्ण गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याची एकूण लांबी अंदाजे १२.२० किलोमीटर
  • गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याची प्रस्तावित रुंदी ४५.७० मीटर
  • बोगद्याची जमिनीखाली खोली – २० ते २२० मीटर
  • समांतर बोगद्यामध्ये प्रत्येकी तीन मार्गिका
  • समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर
  • दोन्ही बोगद्यामधील अंतर १५ मीटर
  • दोन्ही बोगदे छेद मार्गाद्वारे प्रत्येक ३०० मीटरवर एकमेकांशी जोडले जातील
  • प्रगत अग्निरोधक यंत्रणा आणि सीसीटीव्ही यंत्रणा