Mumbai News : मुंबईतील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी खुशखबर समोर आली आहे. खरंतर, मुंबईच्या लोकलला राजधानीची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मुंबई लोकलने रोजाना लाखो प्रवासी प्रवास करतात. दरम्यान मुंबई लोकल बाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे विभागाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर गणपती विसर्जनाच्या दिवशी अर्थातच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई उपनगरातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त राजधानी मुंबईत येतात. यावर्षी अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबरला आहे. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हजारोच्या संख्येने मुंबई उपनगरातून मुंबईमध्ये गणेश भक्त दाखल होणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीसाठी विशेष लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय पश्चिम रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यानच्या स्थानकावर अनेक जलद गाड्यांना थांबा देण्याचा मोठा निर्णय देखील झाला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत सर्व जलद गाड्यांना मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यानच्या सर्व स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
केव्हा आणि कोणत्या मार्गांवर चालवल्या जाणार विशेष लोकल गाड्या
रेल्वेने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर रोजी विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान आठ विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. म्हणजेच अनंत चतुर्दशी अर्थातच 28 सप्टेंबरला मध्यरात्रीपासून ते 29 सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत आठ विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत.
कसं राहणार वेळापत्रक ?
पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली विशेष लोकल गाडी चर्चगेटमधून रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार आहे. दुसरी विशेष लोकल विरार येथून रात्री सव्वा बारा वाजता सुटणार आहे. तिसरी विशेष गाडी चर्चगेट वरून रात्री एक वाजून 55 मिनिटांनी विरारकडे रवाना होणार आहेत. चौथी विशेष गाडी विरार मधून रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी चर्चगेट कडे रवाना होणार आहे.
पाचवी विशेष गाडी चर्चगेट वरून दोन वाजून 25 मिनिटांनी विरार कडे रवाना होणार आहे. सहावी विशेष गाडी रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी विरारवरून चर्चगेटकडे रवाना होणार आहे. सातवी विशेष गाडी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी चिकट येथून विरारकडे रवाना होणार आहे. आठवी विशेष गाडी पहाटे तीन वाजता विरार स्थानकातून चर्चगेट कडे रवाना होणार आहे.