Mumbai News : मुंबईची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण सर्वेक्षण झाले असून, विस्थापित होणाऱ्या एक हजाराहून अधिक कुटुंबीयांनाही सद्यस्थितीत असलेल्या घराची किंमत, जमिनीची किंमत, फळझाडाची किंमत, कशा प्रकारे द्यायचे हे निश्चित करण्यात आले.
मात्र या प्रकल्पासाठी परिसरातील जंगलातील व अभयारण्यातील सुमारे ४.५ लाख झाडांना जलसमाधी मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात पैसे मोजून अन्य जिल्ह्यांत जागा खरेदी करून त्याठिकाणी तिप्पट झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे.
वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हा प्रकल्प होत आहे. प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने दोन वर्षांपासून सर्व्हेक्षण केले आहे. प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणारी सहा गावे व १२ पाड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी वाडा तालुक्यातील वनविभागाची जागेची पाहणी केली आहे.
तसेच बुडित क्षेत्रात येणाऱ्या खासगी मालकीची जमीन, झाडे व घरांच्या किमतीचे दर बाधितांना देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकल्पात अडसर ठरणारी ४.५ लाख झाडे तोडली जाणार आहेत.
या झाडांच्या बदल्यात अन्य जिल्ह्यांत तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात तीनपटीने अधिक झाडे लावण्यात येणार असल्याचे प्रयोजनही महापालिकेकडून करण्यात आले आहे. तोडण्यात येणाऱ्या झाडांची ओळख पटावी म्हणून अजूनपर्यंत सुमारे दोन लाख झाडांवर क्रमांकन (छापणी) चे काम पूर्ण झाले आहे. गेली काही वर्षे तानसा अभयारण्यामुळे परिसरात अनेक निर्बंध लादले गेले. त्याचा फटका स्थानिकांना बसला होता.
तानसा वन्यजीव अभयारण्यालगत हा प्रकल्प होणार आहे. प्रकल्पात ४.५ लाख झाडे बुडित क्षेत्रात येत असल्याने आधी या झाडांच्या बदल्यात तीनपटीने अन्य ठिकाणी झाडे लावण्यात आली.
तरच वनविभाग प्रकल्पातील झाडे तोडण्यास परवानगी देणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. गारगाई प्रकल्पामुळे अंदाजे एक हजार कुटुंब विस्थापित होणार आहेत. विस्थापित होणारी कुटुंबे आदिवासी समाजाची आहेत.
या प्रकल्पामुळे एकूण ११०० हेक्टर जमीन बुडित क्षेत्रात येणार आहे. यामधील ७०० हेक्टर जमीन तानसा अभयारण्याची असल्याने या धरणाचा मोठा फटका तानसा अभयारण्याला बसणार आहे.
प्रकल्प क्षेत्रात येणारी खासगी जमीन संपादनाची कार्यवाही सुरू आहे. तशा प्रकारच्या नोटिसा शेतकऱ्यांना देऊन जमीन संपादनाबाबत विविध वर्तमानपत्रांतून मुंबई महापालिकेने जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. असे असूनही प्रकल्पासाठी पर्यावरण विभाग, वनविभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींचे एकमत झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
गारगाई प्रकल्पात चार लाखांपेक्षा जास्त झाडे जातात. यामधील काही झाडांची छापणी महापालिकेने केली आहे. मात्र ही झाडे तोडण्यासंदर्भात महापालिकेकडून वन्यजीव विभागाकडे आजपर्यंत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. – अक्षय गजभिजे, उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग, ठाणे
गारगाईतून असा होणार पाणीपुरवठा
मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई प्रकल्प उभारला जात आहे. प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर घोडसाखरे या महसूल गावांसह १० ते १२ पाड्यांचा समावेश आहे.
मोखाडा तालुक्यातील आमले हे एकमेव गाव विस्थापित होणार आहे.६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे हे धरण बांधले जाणार आहे. या धरणाचे पाणी दोन किमी अंतरावर असलेल्या मुंबई महापालिकेच्या मोडकसागर धरणात बोगद्याद्वारे गुरुत्वीय पद्धतीने आणले जाणार आहे.
धरणामुळे मोठ्या प्रमाणात वनजमीन संपादित होणार असल्याने त्याचा परिणाम धरण परिसरातील बुडित क्षेत्रात येणाऱ्या झाडांवर होणार आहे.