Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई शहराला स्वप्ननगरी, मायानगरी आणि बॉलीवूड नगरी म्हणून ओळखले जाते. मात्र शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वधारत असल्याने आता शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य मुंबईकर हैराण झाले आहेत.
दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात आहेत. शहरात विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. यामध्ये मुंबई कोस्टल रोड चा देखील समावेश होतो. आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा डिसेंबर 2023 मध्ये सुरू केला जाणार आहे.
खरं तर कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या वरळी टोकापर्यंत मार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत मरीन ड्राईव्हला उत्तर मुंबईमधील कांदिवलीला जोडले जाणार आहे. या कोस्टल रोड प्रोजेक्ट अंतर्गत पहिल्या टप्प्यात मरीन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक 10.58 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होणार आहे.
तसेच दुसऱ्या टप्प्यात वरळी सी लिंक ते कांदिवली दरम्यान 12.4 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. हा एक आठ लेनचा फ्रीवे राहणार आहे. आता या कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा हा डिसेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचे मुंबई महापालिकेने डोळ्यांसमोर ठेवले आहे.
एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेतून समोर आलेल्या माहितीनुसार, हाजी अली ते मरिन ड्राइव्ह हा या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच मे २०२४ मध्ये याचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा पालिकेचा मानस असल्याचे बोलले जात आहे.
यासाठी हाजी अली व महालक्ष्मी मंदिर धार्मिक स्थळांजवळ; तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधा करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक हा 60 मिनिटांचा प्रवास फक्त पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे.
या पहिल्या टप्प्याचे आत्तापर्यंत 80% काम पूर्ण झाले असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत या पहिल्या टप्प्याचे संपूर्ण काम केले जाईल आणि डिसेंबर 2023 मध्ये हा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती समोर येत आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईमधील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे. शहरातील या भागातील नागरिकांना सदर प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून बऱ्यापैकी दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.