मुंबई ते नाशिक प्रवास होणार गतिमान ! 755 कोटी रुपये खर्च करून तयार होणार ‘हा’ सहापदरी मार्ग, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Nashik Travel : मुंबई, पुणे, नासिक या शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखलं जातं. मात्र या सुवर्ण त्रिकोणातील नासिक या शहरातून पुणे आणि मुंबईला प्रवास करणे मोठे आव्हानाचे काम आहे. नाशिकहून पुण्यासाठी सध्या स्थितीला थेट रेल्वे मार्ग नाही.

त्यामुळे जर नाशिकहून पुण्याला जायचे असेल तर यासाठी रस्ते मार्गाने जावे लागते. तसेच जर मुंबईचा विचार केला तर नाशिकहून मुंबई गाठण्यासाठी रस्ते मार्गाने जर जायचे असेल तर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

शिवाय खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हा अनुभव या मार्गावरील प्रवाशांना येतो. यामुळे सुवर्ण त्रिकोणाच्या महत्वाच्या शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी जर एवढा त्रास सहन करावा लागत असेल तर उर्वरित महाराष्ट्रातील काय परिस्थिती असेल हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मात्र आता या सर्व गोष्टी इतिहास जमा होतील आणि एक नवीन अध्याय लिहला जाईल अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे. कारण की नाशिक ते पुणे दरम्यान लवकरच सेमी हाय स्पीड रेल्वे सुरू होणार आहे तर दुसरीकडे नासिक ते मुंबई हा प्रवास देखील गतिमान होणार आहे.

नासिक ते मुंबई हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी गोंदे ते वडपे या सुमारे ९७ किलोमीटर अंतराचे सहा पदरीकरण आणि काँक्रिटीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीचं गेल्या वर्षी या प्रकल्पाची घोषणा केली होती.

दरम्यान रोडकरी नावाने प्रसिद्ध असलेल्या गडकरींची ही घोषणा आता प्रत्यक्षात खरी उतरणार आहे. कारण की, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असे आशादायी चित्र तयार होत आहे. गोंदे ते पिंपरीसदो या जवळपास 20 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी काँक्रिटीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

या कामाचा जवळपास 755 कोटी रुपयांचा आराखडा नुकताच तयार करण्यात आला आहे. या 20 किलोमीटर लांबीच्या मार्गालगत दोन्ही बाजूस सर्व्हिसरोड देखील तयार केला जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता जरी सहा पदरी असला तरी देखील सर्विस रोड पकडून हा रस्ता दहा पदरी होणार आहे.

यामुळे साहजिकच या मार्गालगत स्थायिक असलेल्या स्थानिकांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान या मार्गाचे काम जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे.

या प्रक्रियाअंतर्गत जो कॉन्ट्रॅक्टर नियुक्त होईल त्या कॉन्ट्रॅक्टरला जानेवारी 2024 पासून काम करावे लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसे नियोजन आखले आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे हे नियोजन प्रत्यक्षात खरं ठरतं का हे पाहण्यासारखे राहणार आहे.

दरम्यान जो कोणी कॉन्ट्रॅक्टर हा टेंडर घेईल त्याला अडीच वर्षांच्या काळात या प्रकल्पाचे काम पूर्ण करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे या मार्गावर येत्या अडीच वर्षात वाहने सुसाट धावतील असा आशावाद व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा