Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी आणि त्यांना जलद गतीने प्रवास करता यावा यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. यामध्ये अंधेरी पश्चिम ते मंडाळे दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. दरम्यान या मेट्रो 2 ब मार्गाबाबत आताच एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मेट्रो मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक वगळले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या मेट्रो मार्गावरील महत्त्वाचे स्थानक वगळण्याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. सध्या या मेट्रो 2 ब मार्गिकेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा मेट्रो मार्ग जवळपास 24 किलोमीटर लांबीचा आहे.
या मार्गावर 20 स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या प्रस्तावित करण्यात आलेल्या स्थानकांमध्ये वांद्रे पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील टाटा ब्लॉक्स पारसी कॉलनीसमोर ग्रेस गॅलेक्सी हॉटेल ते मारुती ऑटो व्हिस्टा शोरूमपर्यंतच्या स्थानकाचा देखील समावेश आहे. या स्थानकाला नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक असे नाव देण्यात आले आहे.
पण नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक बनवण्यासाठी साधू वासवानी उद्यानातील काही झाडे कापावी लागणार आहेत. यामुळे २९० चौ.मीटर हिरवळ कमी होणार असे सांगितले जात आहे. परिणामी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील ही हिरवळ कायम राखण्यासाठी स्थानिकांनी हे स्थानक इतरत्र हलविण्याची मागणी केली होती.
याबाबत आशिष शेलार यांनी देखील एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान आता हा पाठपुरावा यशस्वी होणार असे चित्र तयार होत आहे. कारण की एम एम आर डी ए ने हे स्थानक वगळण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर हे स्थानक इतरत्र हलवण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत. मात्र इतरत्र हे स्थानक हलवता येत नाहीये.
यामुळे आता हे स्थानक रद्द करण्याचा निर्णय झाला असून आता या मार्गिकेवर केवळ 19 स्थानके राहणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव एमएमआरडीएने तयार केला असून हा प्रस्ताव एमएमआरडीएच्या अध्यक्षांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.
अद्याप या प्रस्तावावर प्राधिकरणाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. पण जर मुख्यमंत्री महोदय यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला तर या मेट्रो मार्गातील नॅशनल कॉलेज मेट्रोस्थानक वगळले जाणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हे स्थानक रद्द झाल्यास नॅशनल कॉलेज, रेल्वे कॉलनी, टाटा ब्लॉक्स पारसी कॉलनी परिसरातील प्रवाशांना मेट्रो प्रवासासाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. येथील प्रवाशांना खार येथील सारस्वत मेट्रो स्थानक किंवा मग वांद्रे पश्चिम मेट्रो स्थानकात जाऊन मेट्रो पकडावी लागणार आहे. मात्र जर हे स्थानक रद्द झाले तर परिसरातील हिरवळ अबाधित राहील एवढे नक्की.