Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही दशकांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी तसेच दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील आणि उपनगरातील विविध मार्गांवर मेट्रो चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून राजधानी मुंबई सह उपनगरात मेट्रो मार्ग तयार केले जात आहेत. मुंबईमध्ये देशातील पहिला-वहिला भुयारी मेट्रो मार्ग देखील विकसित केला जात आहे.
दरम्यान मुंबई मधील भुयारी मेट्रोमार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनकडून कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो 3 हा मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.
हा भुयारी मार्ग 33.5 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचे 2016 पासून काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गाचे एकूण दोन टप्प्यात काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो चालवली जाणार आहे.
खरंतर हा पहिला टप्पा डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात होते. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे या टप्प्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.
मध्यंतरी डिसेंबर 2023 पर्यंत हा पहिला टप्पा सुरू होणार असे बोलले जात होते. पण या मार्गाचे अजूनही काम पूर्ण झालेले नसल्याने आता हा पहिला टप्पा मार्च 2024 मध्येच सुरू होणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी आरे ते BKC हा मेट्रो मार्ग मार्च 2024 मध्ये सुरू होऊ शकतो अशी माहिती दिली आहे. एकंदरीत, मुंबईमधील भुयारी मेट्रो मार्गाने प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
पण आरे ते बीकेसी या मेट्रो मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून या मार्गाच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या 9 मेट्रो गाड्या देखील आरे येथील कारशेड मध्ये दाखल झाल्या आहेत.
त्यामुळे आरे ते बीकेसी हा मार्ग मार्च 2024 पर्यंत सुरू होईल आणि त्यानंतर बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा सप्टेंबर २०२४ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगितले गेले आहे.
दरम्यान हा संपूर्ण मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर आरे ते कफ परेड हा प्रवास गतिमान होणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.