Mumbai Metro News : 15 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. म्हणजेच हा उत्सव सुरू होऊन दोन दिवसांचा काळ उलटला आहे. नवरात्र उत्सवाची सुरवात मोठ्या धामधुडक्यात झाली आहे. या उत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून दांडिया आणि गरबाची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे.
दरम्यान मुंबई शहरातील गरबा रसिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर नवरात्र उत्सवाच्या काळात मुंबईमध्ये रात्री उशिरापर्यंत गरबा खेळला जातो. गरबा पाहण्यासाठी तसेच खेळण्यासाठी शहरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची रेलचेल पाहायला मिळते. शहरातील विविध भागात दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात रात्री उशिरापर्यंत तोबा गर्दी राहते. अशा परिस्थितीत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा रसिकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
तो म्हणजे नवरात्र उत्सवात मुंबई मेट्रो रात्री उशिरापर्यंत चालवली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मुंबई मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावरील मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत चालवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांवर नवरात्र उत्सवाच्या काळात रात्री साडेदहा नंतर देखील मेट्रो सेवा चालवली जाणार आहे. या मार्गावर मुंबई मेट्रो प्रशासनाकडून अतिरिक्त मेट्रो सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना मेट्रोची सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा रात्रीचा प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे. खरंतर सध्या मुंबईमधील मेट्रो २ अ आणि ७ या दोन्ही मेट्रोमार्गांवर सकाळी सहा वाजेपासून ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत मेट्रो सेवा दिली जात आहे.
सध्या मुंबईमधील या दोन्ही महत्त्वाच्या मेट्रो मार्गावर सोमवार ते शुक्रवार म्हणजेच कामाच्या दिवशी २५३ मेट्रो फेऱ्या चालवल्या जात आहेत. तसेच सुट्टीच्या दिवशी अर्थातच शनिवारी २३८ आणि रविवार २०५ मेट्रो फेऱ्या चालवल्या जात आहेत. पण 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान मेट्रोची सेवा रात्री साडेदहा नंतर देखील सुरू राहणार असून या काळात दररोज मेट्रोच्या 14 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
या अतिरिक्त मेट्रो फेऱ्या दर पंधरा मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील. नवरात्र उत्सवाच्या 19 ते 23 ऑक्टोबरच्या कालावधीत कामाच्या दिवशी २६७ फेऱ्या आणि सुट्टीच्या दिवशी २५२ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे मुंबईकरांना नवरात्रोत्सवाच्या काळात रात्री देखील मेट्रो प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि जलद होईल यात शंकाच नाही.