Mumbai Kolhapur Vande Bharat Express : सध्या महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा आहेत. ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन 2019 मध्ये देशात सर्वप्रथम धावली होती. तेव्हापासून ते आजतागायत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही ट्रेन सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.
अशातच आता राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबई ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या दोन शहरांना आता वंदे भारतची कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. सध्या या रेल्वेमार्गाचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरू असून हा रेल्वे मार्ग वंदे भारत एक्सप्रेस धावण्यासाठी सक्षम झाला की मग या मार्गावर ही गाडी सुरू होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्त्वाचे अपडेट दिली आहे. महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
त्यांच्या मते या मार्गावर सध्या 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वे धावू शकते परंतु वंदे भारत एक्सप्रेसचा वेग 160 किलोमीटर प्रति तास आहे. सध्या या रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि अन्य तांत्रिक सुविधा सक्षम करण्याचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मग या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल असे महाडिक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर रामदास भिसे यांनी या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीच सूचना मिळालेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच काही मीडिया रिपोर्ट्समधून या मार्गावर मार्च 2024 नंतर ही गाडी सुरू होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.