मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम ९९.३६ टक्के झाले असून, अंतिम टप्प्यात आहे. या बोगद्याचे काम १६ मीटर शिल्लक असून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत दुसऱ्या बोगद्याचा ब्रेक थ्रू होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, टनेल बोअरिंग मशीन (मावळा) ने शिखर गाठल्याने येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन पालिका प्रशासनाचे असल्याचे सांगण्यात आले.
कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन भूमिगत बोगदे खोदण्यात आले आहेत. एका बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ मध्ये सुरू झाले आणि येत्या शुक्रवारी २६ मे रोजी हे पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. फक्त १ मीटर बोगद्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे
कोस्टल रोड प्रकल्पात दोन महाकाय बोगदे बांधण्यात येत आहेत. दोन्ही बोगद्यात ३ मार्गिका असणार आहेत. चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने २.०७२ किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात येत आहेत. यातील पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाला आहे,
तर दुसऱ्या बोगद्याचे २,०७० मीटरपैकी सद्यस्थितीत ९९.३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बोगद्याचे १६ मीटरचे काम बाकी असून, ते पुढील दोन दिवसांत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे. परंतु दुसऱ्या बोगद्याचे ब्रेक थ्रु सोमवार किंवा मंगळवारी होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
७४.७२ टक्के काम पूर्ण!
ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्यानंतर २०२० कोरोनाचे संकट आल्याने कामाची गती कमी झाली. मात्र, कोरोना नियंत्रणात आल्यानंतर कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले. १४ मेपर्यंत ७४.७२ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित २५ टक्के काम वेळेआधी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.