Mumbai Central Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील रेल्वे नेटवर्क हे अगदी कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. देशात असा कोणताच भाग नाही ज्याला रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळालेली नाही. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर नेहमीच रेल्वेला पसंती मिळते.
रेल्वेने जलद गतीने प्रवास करता येतो शिवाय यासाठी खर्च देखील कमी लागतो. परिणामी रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतीय रेल्वे कडूनही प्रवाशांचे हित लक्षात घेता वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन मार्गावर एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. तर काही ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन देखील सुरू केल्या जात आहेत. तर काही एक्सप्रेस गाड्यांचे थांबे वाढवले जात आहेत.
दरम्यान मुंबई सेंट्रल वरून धावणाऱ्या अशाच एका एक्सप्रेस ट्रेन बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या स्पेशल ट्रेनला विरारमध्ये थांबा मिळाला आहे.
खरे तर जळगावसहित संपूर्ण खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी ही स्पेशल गाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी एका वर्षापूर्वी सुरू करण्यात आली आहे.
आता या गाडीला विरार मध्ये थांबा मिळणार असल्याने विरार मध्ये राहणाऱ्या खानदेश मधील जनतेला याचा मोठा फायदा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. वास्तविक, या मार्गावरून आधीपासूनच खानदेश एक्सप्रेस चालवली जात आहे.
मात्र खानदेश एक्सप्रेस ही आठवड्यातून तीनच दिवस धावते. अशा परिस्थितीत नवीन स्पेशल गाडीची मागणी झाली होती. या पार्श्वभूमीवर एका वर्षाभरापूर्वी मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान एक विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.
पण या गाडीला खानदेश एक्सप्रेस प्रमाणे विरारमध्ये थांबा दिला गेला नाही. यामुळे या स्पेशल गाडीला देखील विरारमध्ये थांबा मिळावा आणि येथील खानदेशवासीयांना दिलासा दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाने या स्पेशल गाडीला विरार मध्ये थांबा देण्याचे जाहीर केले आहे. गाडी क्रमांक ०९०५१/०९०५२ या मुंबई सेंट्रल ते भुसावळ स्पेशल गाडीला आता विरार मध्ये थांबा देण्यात आला आहे.
याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू देखील झाली आहे. जळगावसहित संपूर्ण खानदेशातील नागरिकांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.