Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प नुकताच सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला असून यामध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा झाल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी काही मोठ्या योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात झाली आहे. विशेष म्हणजे यातील काही योजनांचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही तासांच्या कालावधीतच या योजनेचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.
अशातच आता या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेसाठी उद्यापासून अर्थातच एक जुलै 2024 पासून अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच या योजनेसाठी पात्र महिलांना उद्यापासून अर्ज करता येणार आहे.
या योजनेसाठी अर्ज करणे हेतू फक्त पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 15 जुलै 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. यानंतर 16 जुलै ते 20 जुलै या दरम्यान सादर झालेल्या अर्जांपैकी प्रारूप निवड यादी प्रकाशित केली जाणार आहे.
या यादीवर हरकत घेण्यासाठी 21 ते 30 जुलै पर्यंत मुदत दिली जाणार आहे. यानंतर लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे. ही यादी एक ऑगस्ट 2024 ला जाहीर होणार आहे.
तसेच या योजनेचा प्रत्यक्षात लाभ 14 ऑगस्ट 2024 पासून मिळणार आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप आणि या योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणते कागदपत्रे लागणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे आहे योजनेचे स्वरूप
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. ही योजना मध्यप्रदेश राज्याच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणाऱ्या विवाहित, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, निराधार महिलांना लाभ मिळणार आहे. अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
कोण-कोणते कागदपत्रे सादर करावे लागणार
आधार कार्ड, वय अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड आणि हमीपत्र असे महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहेत.