Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेची घोषणा नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली. तेव्हापासून ही योजना विशेष चर्चेत आहे. चर्चेचे कारण असे की या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजे एका वर्षात पात्र महिलेला 18 हजार रुपयाचा लाभ राज्यातील शिंदे सरकारकडून दिला जाणार आहे. यामुळे या योजनेची सध्या महाराष्ट्रात मोठी चर्चा पाहायला मिळत असून महिलांना या योजनेची भुरळ पडली आहे.
जिकडे तिकडे या योजनेसाठी अर्ज करणे हेतू महिलांची धावपळ पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलावर्ग तहसील कार्यालयात मोठी गर्दी करत आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी फक्त राज्यातील महिला पात्र राहणार आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहतील. या योजनेसाठी ऑगस्ट अखेरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
मात्र अनेकांच्या माध्यमातून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान याच संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत मोठी माहिती दिली आहे.
सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री महोदयांनी या योजनेच्या लाभासाठी कोणालाही पैसे देऊ नका असे आवाहन केले आहे. तसेच यावेळी त्यांनी या योजनेचे पैसे ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात येणार असे सांगितले आहे.
परंतु ही योजना जुलै महिन्यापासून सुरु झाली असल्याने याचा लाभ जुलै महिन्यापासूनच दिला जाणार आहे. म्हणजे जुलै महिन्याचे पैसे देखील महिलांना मिळणार आहेत. खरंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला मोठा फटका बसला आहे.
महायुतीच्या घटक पक्षातील अनेक उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. अशातच आता ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीच्या सरकारला फटका बसू नये यासाठी राज्यातील सरकारने अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली आहे. वर्तमान शिंदे सरकारने सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.