MPSC Success Story : एमपीएससी ही राज्यातील सर्वात टफेस्ट एक्झाम म्हणून ओळखली जाते. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणारे लाखो उमेदवार अहोरात्र अभ्यास करतात. मात्र या लाखो मधून काही बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी अधिकारी बनतात.
अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रत्येकजण आपल्या जीवाचे रान करतो. मात्र काहींना अथक प्रयत्न करूनही यश गवसत नाही. मात्र काही आपल्या प्रयत्नांमुळे अन जिद्दीमुळे एमपीएससीचे शिखर सर करतात. असच एक उदाहरणं समोर येत आहे ते परळी वैजनाथ येथून.
परळी वैजनाथ तालुक्यातील तडोळी या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या शेतकरी पुत्राने अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत एमपीएससी यश मिळवले आहे. प्रमोद भास्कर सटाले असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे. प्रमोद यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य शेतकरी कुटुंबासारखीच.
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या प्रमोदला मात्र काहीतरी मोठे करायचे होते. प्रमोदचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न वाटत होते तेवढे सोपे नव्हते. यासाठी प्रमोदला मोठी मेहनत घ्यावी लागली. पण काहीतरी करूनच दाखवायचे या जिद्दीने पेटून उठलेले प्रमोद जोपर्यंत यश गवसले नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहिलेत.
आज अखेर प्रमोद यांचे स्वप्न खरे ठरले असून त्यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत असे यश मिळवत वित्त व लेखा अधिकारी बनले आहेत. या नेत्रदीपक कामगिरीमुळे प्रमोद यांच्यावर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान आज आपण प्रमोद यांच्या या यशोगाथा विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शिक्षण कुठून घेतले ?
प्रमोद यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी प्राथमिक शिक्षण अर्थातच चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावातच घेतले. यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांच्या गावात जवळील मांडखेलच्या आसूबाई विद्यालयात पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण घेताना ते त्यांच्या गावातून मांडखेलला पायी जात असत.
दहावीपर्यंतचे शिक्षण मांडखेलला पूर्ण केल्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी त्यांच्या मामाच्या गावी घेतले. त्यानंतर एमआयटी लातूर मधून बीबीए पूर्ण केले. बीबीए नंतर त्यांना लगेचच नोकरी करायची होती. मात्र उच्च शिक्षणाचीही आवड होती. त्यामुळे घरच्यांची समज घालत त्यांनी घरच्यांना उच्च शिक्षणासाठी राजी केले.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केव्हा सुरू केला
त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला यूपीएससीचा अभ्यास केला. जूनियर ऑडिटर म्हणून नोकरी केली. कालांतराने नोकरीचा राजीनामा दिला आणि 2014-15 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे ग्रुप बी ची राज्य विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) परीक्षा ते उत्तीर्ण झालेत. यामुळे त्यांच्या आयुष्यात थोडीशी आर्थिक स्थैर्यता लाभली.
अखेरकार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवले यश
आता, ते राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाले असून त्यांची वित्त व लेखा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. प्रमोद त्यांची घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती, आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण मुलांना शिकवायचं असं त्यांच्या वडिलांनी ठरवलेलं होतं.
मग काय प्रमोद व त्यांच्या दोन्ही भावंडांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी 10 एकर जमिनीपैकी 7 एकर जमिनी विकून टाकली अन आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. प्रमोद यांचे एक बंधू वकील आहेत तर एक भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. निश्चितच प्रमोद यांचा हा जीवन प्रवास इतर शेतकरी पुत्रांसाठी देखील आदर्शवत ठरणार आहे.
जर एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर कितीही खडतर परिस्थिती असली तरी देखील मार्ग निघतो आणि यशाला गवसणी घालता येते हेच प्रमोद यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे.