Monsoon Update : भारतीय शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची आणि थोडीशी त्रासदायक बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे भारतीय शेती ही सर्वस्वी पावसावर आधारित आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात भला मोठा वाटा मान्सूनचा देखील आहे. मात्र यावर्षी मान्सून शेतकऱ्यांसोबत दगा फटका करण्याची दाट शक्यता आहे.
भारतात जवळपास तीन वर्षांपासून मान्सून काळात समाधानकारक आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित आणि चांगले उत्पादन मिळत आहे. शिवाय मान्सून काळात कोसळलेला पाऊस रब्बी पिकांसाठी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी देखील फायदेशीर ठरत असून शेतकऱ्यांना शेतीतून बारामाही उत्पन्न मिळत आहे.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गेली तीन वर्ष देशात ला-निना ही हवामान प्रणाली तयार झाली होती. यामुळे गेली तीन वर्ष पावसाळी काळात पाऊस चांगला होता. मात्र आता हवामान प्रणाली बदलणार असून अल निनो चा धोका वाढणार आहे. या अल निनो मुळे यंदा मात्र संपूर्ण देशभरात सरासरी पेक्षा कमी पाऊस पावसाळी काळात कोसळणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. अमेरिकन हवामान विभाग नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन यांनी याबाबत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या अहवालात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा कमी पाऊस भारतात पडेल असं सांगितलं गेलं आहे. अल निनो ची परिस्थिती ही जून ते ऑगस्ट दरम्यान राहणार असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे. भारतीय मान्सून हा जून ते सप्टेंबर पर्यंत राहतो आणि याच काळात अलनिनो ही हवामान प्रणाली सक्रीय राहणार असल्याने यंदा पाऊस कमी राहील असा अंदाज अमेरिकेतील हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.
विशेष म्हणजे अमेरिकन हवामान विभागाने सलग दुसऱ्या महिन्याच्या आपल्या अहवालात अलनिनो ची परिस्थिती भारतीय मान्सूनसाठी प्रतिकूल ठरणार असल्याचे सांगितलं आहे. जानेवारीमध्ये जुलै नंतर अललिनोची परिस्थिती उद्भवेल असं सांगितलं होतं मात्र आता जून पासूनच अलनिनो ही हवामान प्रणाली तयार होईल असा अंदाज सांगितला गेला आहे. मात्र भारतीय तज्ञांनी आताच याबाबत अंदाज बांधणे चुकीचे आणि घाईचे ठरणार असल्याचे नमूद केले आहे.
याबाबत एप्रिल मे च्या महिन्यात योग्य अंदाज येईल असे देखील तज्ञ नमूद करत आहेत. मात्र काही भारतीय तज्ञांनी सलग दोन महिने एखादी संस्था जर असा अंदाज बांधत असेल तर यावर गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केल आहे. एकंदरीत पुढील काही महिन्यात या हवामान प्रणालीबाबत योग्य ती माहिती समोर येईल आणि तेव्हाच भारतीय मानसून यंदा कसा असेल याबाबत स्पष्टोक्ती येणार आहे.