Monsoon News : सध्या संपूर्ण देशाचे मान्सून कडे लक्ष लागून आहे. शेतकरी बांधव अगदीच चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. अशातच मान्सून संदर्भात भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आय एम डी ने मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज नुकताचं जाहीर केला आहे.
यावेळी भारतीय हवामान खात्याने मान्सूनचे आगमन कधी होणार आणि मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची परिस्थिती कशी राहणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे येत्या चार दिवसात अर्थातच 31 मेला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे.
मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक परिस्थिती असून लवकरच मान्सून केरळमध्ये येणार आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला येत असतो यंदा मात्र एक दिवस लवकरच केरळमध्ये मोसमी पाऊस पोहोचणार असा अंदाज IMD ने जारी केला आहे.
हवामान खात्याने यंदा जून महिन्यात ईशान्य भारतात कमी पाऊस पडणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. ईशान्य भारतात पुढील महिन्यात सरासरी ९४ टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे.
तसेच, जून महिन्यात उत्तर भारतात ९२ ते १०८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे ९४ ते १०६ टक्के आणि दक्षिण भारतात ९४ ते १०६ टक्केपेक्षा जास्त पाऊस पडणार असा अंदाज आहे.
म्हणजे जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. आपल्या राज्यात जून महिन्यात सरासरी २०९.८ मिलीमीटर पाऊस पडत असतो. दरम्यान, यंदा पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात अर्थातच जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढल्या महिन्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असे बोलले जात आहे. जून महिन्यासह संपूर्ण मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पावसाळी काळात राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडणार अशी शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे यंदा जून महिन्यात एलनिनो ची स्थिती निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मॉन्सूनसाठी सकारात्मक अशा ला-निनाची स्थिती जुलै अखेरपर्यंत सक्रिय होणार आहे.
इंडियन ओशियन डायपोल देखील मान्सून काळात पॉझिटिव्ह होणार आहे. ही गोष्ट मान्सूनच्या प्रवासासाठी फायदेशीर ठरणार असून यामुळे मान्सून काळात चांगला पाऊस पडणार आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
एकंदरीत मान्सूनच्या उत्तरार्धात यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. निश्चितच भारतीय हवामान खात्याचा मान्सून बाबतचा हा दुसरा अंदाज देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा राहणार आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठे प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.