Monsoon 2025 : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. येत्या सोळा-सतरा दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशातच मान्सून 2025 संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. खरे तर 2023 च्या म्हणजेच गेल्या वर्षीच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव पाहायला मिळाला.
यानंतर 2024 च्या मान्सूनवर थोड्या प्रमाणात ला निनाचा प्रभाव राहिला आणि यामुळे यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून काळात चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे.
काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून काळात अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
अशातच आता 2025 च्या मान्सून संदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जागतिक हवामान विभागानं जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ला निना सक्रिय होणार असा अंदाज दिला आहे.
जर या अंदाजाप्रमाणे जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ला निना सक्रिय झाला तर भारतामध्ये पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
खरेतर जेव्हा एल निनोचा प्रभाव असतो तेव्हा देशात मान्सूनसाठी प्रतिकूल वातावरण बनतं, त्यामुळे सरासरी इतका देखील पाऊस पडत नाही. अगदीच दुष्काळी स्थिती निर्माण होते. 2023 मध्ये संपूर्ण भारताने ही परिस्थिती अनुभवली आहे.
महाराष्ट्राला 2023 मध्ये दुष्काळाची झळ सर्वाधिक बसली. राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची झळ पाहायला मिळाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पण जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील वर्षी जगासह भारतात ला निनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता असून, काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता आहे.
आपल्या राज्यात जर ला निनाचा प्रभाव राहिला तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. मात्र मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिल्यास या वर्षी राज्यात चांगला आणि सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.