Milk Rate Increased : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय कामाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील एका मोठ्या दूध संघाने दूध दर वाढीची मोठी भेट दिली आहे.
वारणा या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दूध संघाने म्हशीच्या दूध खरेदी दरात मोठी वाढ केली आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे वारणा दूध उत्पादक संघाशी निगडित सभासद पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये पशुपालन हा व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पशुखाद्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे पशुखाद्याच्या किमतीत वाढ होत आहे तर दुसरीकडे दुधाच्या दरात अपेक्षित अशी ग्रोथ पाहायला मिळत नाहीये. दुधाचे दर दबावात आहेत.
अशा या विपरीत परिस्थितीमध्येच मध्यंतरी लंपी या आजाराचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले होते. वाढती महागाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी, वाढलेले इंधनाचे दर, हवामान बदलामुळे घटत असलेले दूध उत्पादन, दुधातील कमी होत चाललेले फॅटचे प्रमाण यामुळे आता दुधाचा धंदा हा जुगारासारखा झाला आहे.
यातून आता शाश्वत उत्पन्नाची आशा ठेवणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे. पशुपालकांपुढे दूध व्यवसाय करताना विविध आव्हाने येत आहेत. हेच कारण आहे की आता हा व्यवसाय शेतकऱ्यांना डोईजड वाटू लागला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी जोर धरत आहे.
अशातच वारणा दूध संघाने मोठा निर्णय घेतला असून म्हशीच्या दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वारणाच्या ज्या म्हैस दूध उत्पादकांना फरक बिल नको असेल तर अशा दूध उत्पादकांना सध्याच्या दूध दरात प्रति लिटर तीन रुपये वाढ दिली जाणार आहे.
तसेच ज्या म्हैस दूध उत्पादकांना फरक बिल हव असेल त्यांना प्रति लिटर एक रुपयाची वाढ दिली जाईल आणि अडीच रुपये प्रमाणे फरक बिल दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. संघाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी ही घोषणा केली आहे.