Mhada News : मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नवी मुंबई, अमरावती यांसारख्या महानगरात घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत या महानगरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अनेकांना घरांच्या वाढलेल्या विक्रमी किमती पाहता घराचे स्वप्न पूर्ण करताना अडचणी येत आहेत.
अशा स्थितीत आता नागरिक म्हाडा व सिडको कडून उपलब्ध होणारी परवडणाऱ्या दरातील घरांची खरेदी करत आहेत. यासाठी म्हाडा व सिडकोच्या लॉटरीमध्ये नागरिक सहभागी होत आहेत आणि आपले घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. अशातच म्हाडाच्या घरांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. म्हाडाने आता सर्वसामान्य नागरिकांसाठी लॉटरीची प्रक्रिया अजूनच सुलभ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
खरंतर म्हाडाकडून जाहीर होणाऱ्या योजनेतून जे अर्जदार विजयी ठरतात त्या विजेत्यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी लॉटरी जिंकल्यानंतरही अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी त्यांना वारंवार बँकेच्या फेऱ्या माराव्या लागतात.स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी जमा करण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागते.
या प्रक्रियेसाठी लॉटरी निघाल्यानंतरही जवळपास एक ते दोन वर्षांचा काळ लागतो. अर्थातच लॉटरी जिंकले म्हणजेच लगेचच विजेत्यांना घराची चावी मिळत नाही तर यासाठी त्यांना काही काळ थांबावे लागते. मात्र आता ही प्रक्रिया म्हाडाने सुलभ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन निर्णयानुसार आता म्हाडाने एकल खिडकी योजना राबवण्याचे ठरवले आहे.
याअंतर्गंत म्हाडाच्या मुख्यालयातच लॉटरी नंतरची सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यामुळे आता म्हाडाचे घर मात्र अडीच महिन्यात विजेत्यांना मिळणार आहे. यासाठी सध्या म्हाडा कडून काम सुरू असून भविष्यातील घरांच्या सोडतीसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच सध्याच्या मुंबई मंडळाच्या चार हजार 82 घरांसाठी ही नवीन सुविधा उपलब्ध राहणार नाही.
पण भविष्यातील सोडतीसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. एवढेच नाही तर विजेत्या ठरलेल्या लोकांना कर्जासाठी देखील म्हाडाकडून मदत केली जाणार आहे. यासाठी म्हाडाने काही बँकेसोबत करार केले आहेत. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, म्हाडा आपल्या कार्यालयातच मुद्रांक शुल्क आणि डिजिटल नोंदणी केंद्र सुरू करणार आहे.
यामुळे लॉटरी विजेत्यांना मालमत्ता नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. या ई नोंदणी प्रक्रियेवर सध्या म्हाडाकडून काम सुरू असून उद्या होत असलेल्या सोडतीसाठी ई-नोंदणी सुविधा उपलब्ध नसणार आहे. पण आगामी घरांच्या लॉटरीसाठी ही नवीन सुविधा विजेत्यांना उपलब्ध होणार आहे.