Mhada Mumbai Lottery Date : म्हाडाच्या मुंबई मंडळांने 2019 नंतर प्रथमच चार हजार 82 घरांसाठीची योजना जाहीर केली आहे. मे 2023 मध्ये ही योजना जाहीर करण्यात आली. यासाठी लाखो अर्जदारांनी अर्ज देखील भरले आहेत. सुरुवातीला या योजनेला नागरिकांनी अपेक्षित असा प्रतिसाद दाखवला नाही, मात्र नंतर याला प्रतिसाद वाढला आणि लाखो लोकांनी या घरांसाठी अर्ज केले आहेत.
खरंतर, या चार हजार 82 घरांसाठी 18 जुलै 2023 रोजी लॉटरी काढली जाणार होती. मात्र अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. यामुळे लॉटरीची तारीखही रद्द करण्यात आली. म्हाडा मुंबई मंडळाच्या या 4 हजार 82 घरांसाठीच्या सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले. दरम्यान या सोडतीसाठी सादर करण्यात आलेल्या अर्जदारांची अंतिम यादी जाहीर झाली तरीदेखील या घरांसाठी लॉटरीची डेट फिक्स करण्यात आली नव्हती. यामुळे ही लॉटरी केव्हा निघणार? हा प्रश्न अर्जदारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
मात्र आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या 4 हजार 82 घरासाठीच्या लॉटरीची डेट जाहीर केली आहे. अतुल सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या 4 हजार 82 घरांच्या विक्रीसाठी 14 ऑगस्ट 2023 रोजी लॉटरी काढली जाणार आहे. 14 ऑगस्ट ला सकाळी साडेअकरा वाजता ही लॉटरी काढली जाणार असून यासाठी एक लाख 20 हजार 144 अर्जदार पात्र ठरले आहेत.
सावे यांनी सांगितल्याप्रमाणे, ही लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढली जाणार असून या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीबाबत आतुरतेने वाट पाहिली जात होती ती प्रतीक्षा आता येत्या चार दिवसांत संपुष्टात येणार असून हजारो विजयी उमेदवारांना आपल्या घराचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण करता येणार आहे.