Mhada Konkan Lottery : म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
सर्वसामान्यांना आता या महानगरात घर घेणे स्वप्नापल्ल्याड झाले आहे. परिणामी सर्वसामान्य लोक मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात घर घ्यायचे असल्यास म्हाडा किंवा सिडकोच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहतात.
अशातच आता ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आज अर्थातच 15 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे मुंबई महानगरक्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे.
कोकण मंडळाकडून तब्बल 5311 घरांसाठी आज जाहिरात काढली जाणार आहे. विशेष म्हणजे आजपासूनच या सोडतीसाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेचा शुभारंभ आज सकाळी साडेदहा वाजेपासून होणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, या सोडतीमध्ये एक हजार 10 घरे पंतप्रधान आवास योजनेची राहणार आहेत.
तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेची 1037 घरे राहणार आहेत, सर्वसमावेशक योजनेची 919 घरे राहणार आहेत, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका राहणार आहेत, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत 2278 घरे राहणार आहेत.
कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
अर्ज विक्री आणि स्वीकृतीची अंतिम दिनांक : या सोडतीसाठी 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून ते 16 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करण्याची अंतिम दिनांक : 18 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.
बँकेत अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक : आरटीजीएस व एन इ एफ टी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर आहे. बँकेच्या कार्यालयीन वेळेत या तारखेपर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे.
पात्र अर्जाची अंतिम यादी केव्हा जाहीर होणार : तीन नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता या सोडतीसाठी सादर होणाऱ्या अर्जांपैकी पात्र अर्जांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी ही म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
लॉटरी केव्हा निघणार? : 7 नोव्हेंबर 2023 ला या सोडतीसाठीची लॉटरी जाहीर केली जाणार आहे.