Maize Farming : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात मका, सोयाबीन, कापूस इत्यादी पिकांची लागवड केली जाणार आहे. यंदा पाऊसमान चांगला राहणार असा अंदाज नुकताच भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असून यामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी मोठे उत्सुक पाहायला मिळत आहेत.
चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने यंदा मक्याची देखील लागवड वाढेल असा अंदाज आहे. मका लागवड वाढण्याचे कारण म्हणजे मक्याच्या बाजारभावात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने तेजी पाहायला मिळाली आहे.
मक्याचा वापर इथेनॉल मध्ये देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे शिवाय पोल्ट्रीमध्ये देखील मक्याचा वापर वाढला आहे आणि हेच कारण आहे की मक्याला चांगला दर मिळतोय. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण मक्याच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तथापि शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मगदूर आणि स्थानिक हवामान पाहून योग्य जातीची निवड करावी जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन मिळेल.
हार्वेस्टिंगसाठी लवकर तयार होणाऱ्या मक्याच्या सुधारित जाती
पुसा संकर मका १ : मक्याची ही एक सुधारित जात असून आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या जातीची शेती केली जाते. या जातीची लागवड पावसाळ्यात केली जाते. हा वाण खरीप हंगामासाठी अनुकूल असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केलेला आहे.
या जातीचे पीक पेरणीनंतर 70 ते 80 दिवसात परिपक्व होते. या जातीच्या दाण्यांचा रंग नारंगी पिवळा असतो आणि यापासून हेक्टरी 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे.
विवेक संकरित मका २१ : मक्याचा हा देखील एक लोकप्रिय प्रकार आहे. या जातीच्या मक्याचे दाणे हे पिवळ्या रंगाचे असतात. या जातीपासून हेक्टरी 45 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. ही जात लवकर काढण्यासाठी तयार होते. 70 ते 80 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते.
विवेक संकरित मका २७ : या जातीची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. या जातीच्या मक्याचे दाणे पिवळ्या रंगाचे असतात. यापासून हेक्टरी 50 ते 55 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. 70 ते 80 दिवसात या जातीचे पीक काढण्यासाठी तयार होते.
४) महाराजा : नारंगी दाण्याची ही जात अधिक उत्पादनासाठी ओळखली जाते. महाराजा या जातीपासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळत असल्याने याची मोठ्या प्रमाणात पेरणी होत आहे.
सरासरी 70 ते 80 दिवसात या जातीचे पीक हार्वेस्टिंग साठी तयार होते आणि यापासून हेक्टरी 60 ते 65 क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.