Maize Farming : मका हे एक असे पीक आहे ज्याची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. रब्बीच्या तुलनेत खरीपात मका लागवडीखालील क्षेत्र थोडेसे अधिक आहे. मात्र रब्बी हंगामातही मका लागवड मोठ्या प्रमाणात होते यात शंकाच नाही.
राज्यात यावर्षीच्या खरीप हंगामातही मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. पण, यावर्षी जुन आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस बरसला असल्याने मक्याची अपेक्षित वाढ झालेली नाही. यामुळे खरीप हंगामातील मक्याचे उत्पादन कमी होणार असा दावा केला जात आहे.
दरम्यान जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यात चांगला जोरदार पाऊस झाला आहे. या चालू सप्टेंबर महिन्यात तर राज्यातील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळे ऑगस्ट महिन्याची पावसाची तूट भरून निघेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. या जोरदार पावसामुळे राज्यातील बहुतांशी धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे हा पाऊस येत्या रब्बी हंगामासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. यामुळे आज आपण मक्याच्या रब्बी हंगामातील सुधारित जातींची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर खरीप हंगामातुन राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाहीये. त्यामुळे आता शेतकऱ्यांची भिस्त रबी हंगामावर राहणार आहे.
रब्बी हंगामामध्ये यंदा मक्याची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शेतकरी बांधवांना जर मक्याच्या पिकातून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित वाणांची पेरणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण मक्याच्या सुधारित वाणांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मक्याचे सुधारित वाण खालील प्रमाणे
आझाद उत्तम : या जातीची रब्बी हंगामात लागवड केली जाऊ शकते. या जातीचे पीक जवळपास सात फूट उंचीपर्यंत वाढते. विशेष म्हणजे पेरणीनंतर 75 ते 80 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनत असल्याचा दावा केला जातो. या जातीपासून एकरी 16 क्विंटलचा उतारा शेतकऱ्यांना मिळत आहे. निश्चितच या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. या जातीचे पीक उंच वाढत असल्याने जनावरांसाठी या जातीपासून उत्तम चारा देखील मिळतो. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसाठी या वाणाची लागवड फायदेशीर ठरू शकते.
HM 10 : ही देखील मक्याची एक सुधारित जात आहे. राज्यातील बहुतांशी भागात या जातीचा मका पेरला जातो. या जातीची विशेषता म्हणजे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात याची लागवड केली जाऊ शकते. रब्बी हंगामात पेरणी केल्यास साधारणता 170 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. एकरी 36 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळू शकते. उत्पादनाच्या बाबतीत ही जात इतर जातींच्या तुलनेत सरस आहे.
HQPM5 : हा देखील एक सुधारित वाण आहे. एचएम 10 या जातीप्रमाणेच याही जातीची लागवड रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात केली जाऊ शकते. पण रब्बी हंगामात या जातीपासून अधिकचे उत्पादन मिळते. रब्बी हंगामात साधारणता 170 ते 180 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. एकरी 35 ते 36 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
गंगा 11 : महाराष्ट्रात उत्पादित होणारी मक्याची एक मुख्य जात. या जातीची राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामासाठी गंगा 11 हा वाण उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. रब्बी हंगामाचा जर विचार केला तर साधारणतः 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक परीपक्व बनते आणि रब्बी हंगामामध्ये या जातीपासून एकरी 24 ते 28 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.